पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:52 IST2025-10-14T10:52:26+5:302025-10-14T10:52:44+5:30
कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती, त्यावेळी बसने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला

पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, महिला जखमी, कात्रज घाटातील घटना
कात्रज : कात्रज घाट वळणावर मंगळवारी सकाळी पावणे नऊ दरम्यान दुचाकी व पीएमपीएमएलचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.
या अपघाताबाबत सदर माहिती अशी की, कात्रज आगाराची कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती. पीएमटीने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात आकाश रामदास गोगावले (वय 29 वर्षे रा. ससेवाडी ता. भोर) व अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) यांचा मृत्यू झाला असून असून नेहा कैलास गोगावले (वय 20 वर्ष रा.ससेवाडी ता.भोर) या जखमी असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
पीएमटीचे चालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42 वर्ष रा. आर्वी, पुणे) यास ताब्यात घेतले असून त्यास वैद्यकीय तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी होती. भारती विद्यापीठ वाहतूक विभाग व आंबेगाव पोलीस स्टेशन कडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कात्रज चौकापासून कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गुजर निंबाळकरवाडी फाटा तसेच भिलारेवाडी या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. सकाळी व सायंकाळच्या वेळी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. या अगोदर देखील अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यावरती उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.