प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे ‘पीएमपी’ला चिंता;बससंख्या वाढली, तरी प्रवासी संख्येत होतेय घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:54 IST2025-10-07T19:54:14+5:302025-10-07T19:54:51+5:30
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते.

प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे ‘पीएमपी’ला चिंता;बससंख्या वाढली, तरी प्रवासी संख्येत होतेय घट
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रवासी संख्येत यंदा प्रत्येक महिन्यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शिवाय पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या वाढलेली असताना प्रवासी संख्येत होणारी घट ही पीएमपीसमोर मोठी चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी दिवसाला १२ लाख प्रवासी असल्याचा दावा करणाऱ्या पीएमपीला यंदा एकाही महिन्यात १२ लाख प्रवासी संख्येचा टप्पा गाठता आलेला नाही. गेल्या ९ महिन्यांत प्रवासी संख्येत घट झाली आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. या मार्गातील हद्दीत साधारण दररोज १८०० बस असतात. गेल्या काही वर्षांपासून पीएमपीची प्रवासी संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. ती वाढविण्यासाठी पीएमपीकडून सतत प्रयत्न सुरू असते. नवीन अध्यक्ष आल्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवून प्रवासी सेवा सुधारण्याबरोबरच प्रवासी वाढविण्याकडे लक्ष दिले जाते. त्यासाठी पीएमपीकडून सुरुवातीला बस वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता पीएमपीच्या ताफ्यात बस वाढल्या आहेत; पण पीएमपीची प्रवासी संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पीएमपीसमोर प्रवासीसंख्या कशी वाढवायची असा प्रश्न आहे.
गेल्या नऊ महिन्यांत प्रवासी संख्येत घट :
पीएमपीतून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दिवसाला सरासरी १२ लाख २० हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतरच्या २० महिन्यांत मात्र, ही दैनंदिन सरासरी गाठण्यात अपयश आले आहे. २०२५ मध्ये आठ महिन्यांपैकी एकाही महिन्यात दिवसाला सरासरी १२ लाख प्रवासी गाठता आलेले नाहीत. २०२४ च्या पहिल्या आठ महिन्यांतील प्रवासी संख्या आणि यंदाची पहिल्या नऊ महिन्यांची दिवसाची सरासरी प्रवासी संख्या पाहिली; तर प्रवासी संख्या सात टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे. जून महिन्यापासून पीएमपीची प्रवासी संख्या वाढते; पण यंदा जूनमध्येच गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवसाला सव्वालाख प्रवासी घटल्याचे दिसत आहे. येत्या काही महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात १२०० बस येणार आहेत. त्यामुळे पीएमपीला प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
लोकसंख्या वाढली, पण प्रवासी संख्या स्थिर
मागील काही काळात सर्व अधिकाऱ्यांना दोन दिवस मार्गावर फिरण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांना डेपो दत्तक देऊन त्या मार्गावरील प्रवासी संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पीएमपीची प्रवासी १२ लाखांच्या पुढे गेली होती. ती प्रवासी संख्या १५ लाखांवर नेण्याच्या उद्दिष्ट ठेवले होते. त्या वेळी मार्गावरील बस तेवढ्याच होत्या; पण नंतर अधिकारी बदलले आणि पीएमपीची ध्येयधोरणेही. त्यामुळे प्रवासी संख्येत पुन्हा घट होऊन ती वाढली नाही. शहराची लोकसंख्या वाढत असताना अनेक वर्षांपासून पीएमपी प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही.
गेल्या नऊ महिन्यांतील आकडेवारी :
महिना -- २०२४---२०२५
जानेवारी -- १२,२०,६५३--११६२५४२
फेब्रुवारी--१२,१४,५५१--१०,९९,७८४
मार्च --११,३९,१०७--१०,७९,७४१
एप्रिल--१०,८९,०९२--१०,६१,२०३
मे--१०,५३,२०१--१०,१६,२३५
जून--११,२८,५६१--१०,०४,०५७
जुलै--११,३४,३३८--१०,९२,२५५
ऑगस्ट--११,९२,५३१--११,०८,६५३
सप्टेंबर--११,८९,९०७--११,१४,०२४