राजू हिंगे
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन पक्ष एकत्र आले. पण या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना या दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म देताना गोंधळ घातला. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली. तर काही प्रभागांमध्ये बंडखोर झाली. त्यात काही प्रभागांत काही उमेदवार "घड्याळ" तर काही "तुतारी"वर लढत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका करून आक्रमकपणे प्रचार केला होता. पण निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीला २०१७च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या "अलार्म"चा गजर अन् तुतारीची "वेळ" चुकून झालेली आघाडी फसली, जागा घटल्या अशीच स्थिती झाली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर झाली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सुरुवातीला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव सेनेबरोबर चर्चा करत होता. पण अचानक दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीसाठी बोलणी सुरू झाली. पण आघाडी फिस्कटल्याचे दाखवत महाविकास आघाडीबरोबर चर्चा केली. पण ऐनवेळी दोन्ही राष्ट्रवादीची उमेदवारी अर्ज भरण्यास एक ते दोन दिवस बाकी राहिले असताना आघाडी झाली. या आघाडीच्या वादात माजी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक इच्छुक होते. भाजपने २०१७ साली निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ५३ जणांचे पत्ते कट केले आहेत. त्यांच्या जागी अन्य पक्षांतून आलेल्या भाजपने आयारामांना संधी दिली होती. त्यामुळे भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अनेकांनी प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने भाजपविरुद्ध राष्ट्रवादी होईल अशी अटकळ बांधली जात होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाला आयते उमेदवार मिळाले होते. पण पक्षाचे नाराज कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय झाले नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात प्रचारासाठी ठाण मांडून होते. भाजपच्या त्रिकुटावर आणि पालिकेतील कारभारावर जोरदार टीका करून भाजप विरोधात आक्रमकपणे प्रचार केला होता. त्याचवेळी "एक अलार्म पाच काम" असे कॅम्पेन केले होते. त्यासाठी भाजपने शहराची वाट कशी लावली यावर खास गाणे तयार केले होते. त्याचवेळी जाहीरनाम्यात मेट्रो आणि पीएमपी बससेवा मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करायला बापाचं काय जातं, खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा अशी टीका केली होती. या मोफतच्या घोषणेवरून पुण्यात जुगलबंदी रंगली होती. पण या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता देऊन "मोफत घोषणा" अप्रत्यक्षपणे नाकारल्या आहेत. २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ जागा होत्या. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला या पालिका निवडणुकीत ३० जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
Web Summary : NCP's alliance in Pune Municipal Corporation election faltered due to internal conflicts and candidate confusion. Despite aggressive campaigning by Ajit Pawar, NCP won fewer seats than in 2017, as BJP secured a majority, rejecting NCP's free service promises.
Web Summary : पुणे महानगरपालिका चुनाव में एनसीपी का गठबंधन आंतरिक कलह और उम्मीदवार भ्रम के कारण विफल रहा। अजित पवार के आक्रामक प्रचार के बावजूद, एनसीपी ने 2017 की तुलना में कम सीटें जीतीं, क्योंकि बीजेपी ने बहुमत हासिल किया, एनसीपी के मुफ्त सेवा वादों को खारिज कर दिया।