लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:27 IST2025-11-11T09:27:09+5:302025-11-11T09:27:25+5:30
थेऊर फाटा ते केसनंद रोड मार्गावरून तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भूश्याखाली लपवलेले अनेक रंगांचे प्लास्टिक कॅन सापडले. त्यात तयार गावठी हातभट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले

लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई!
उरुळी कांचन: अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोरपोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल २,१०,००० रुपयांची २१०० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि महेंद्र पिकअप टेम्पो असा एकूण १०,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेएक वाजता करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली होती की थेऊर फाटा ते केसनंद रोड मार्गावरून एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो (क्रमांक एमएच १२ एमव्ही ५०१७) हातभट्टी दारू घेऊन जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, तसेच पोलीस हवालदार दिगंबर जगताप व पोलीस शिपाई अमोल जाधव यांच्या पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली. पथकाने चिंतामणी हायस्कूल थेऊर चौकात सापळा रचला. दरम्यान, संशयित टेम्पो पोलिसांना दिसताच थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढला. मात्र पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करून थेऊर स्मशानभूमीजवळ वाहन ताब्यात घेतले.
तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भूश्याखाली लपवलेले अनेक रंगांचे प्लास्टिक कॅन सापडले. त्यात तयार गावठी हातभट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले. वाहन चालकाची ओळख सोमनाथ सुरेश राखपसरे (वय २९, रा. दहीटणे, ता. दौंड, जि. पुणे) अशी झाली. चौकशीत त्याने ही दारू गणेश चव्हाण (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्या हातभट्टीवरून आणल्याचे कबूल केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५(क) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.