जुन्नर बाजार समितीच्या ३० कोटींच्या जमीन खरेदीत २२.५० कोटींचा गैरव्यवहार ? शरद सोनवणेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:42 IST2025-10-10T11:40:40+5:302025-10-10T11:42:41+5:30
- भ्रष्ट कारभाराविरोधात उपबाजार केंद्रापर्यंत काढला पायी मोर्चा; बारामतीची कितीही ताकद लावली तरी हा व्यवहार रद्द करणारच

जुन्नर बाजार समितीच्या ३० कोटींच्या जमीन खरेदीत २२.५० कोटींचा गैरव्यवहार ? शरद सोनवणेंचा आरोप
नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० कोटींच्या जमीन खरेदी प्रकरणात २२.५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार शरद सोनवणे यांनी केला आहे. बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी १० एकर जमीन ३० कोटींना खरेदी केली; परंतु प्रत्यक्षात ही जमीन ७.५० कोटींना घेतल्याचा दावा करत सोनवणे यांनी या व्यवहारातील ३ कोटी रुपये ‘सर्वांना मॅनेज’ करण्यासाठी ठेवल्याचा आरोप केला. ‘बारामतीची कितीही ताकद लावली तरी हा व्यवहार रद्द करणारच आणि काळे यांची सत्ता घालवणार,’ असा इशारा सोनवणे यांनी नारायणगाव येथील मोर्चा आणि सभेत दिला.
जुन्नर बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव एसटी स्टॅण्ड ते वारूळवाडी येथील बाजार समितीच्या उपबाजार केंद्रापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी सभेत संचालक माउली खंडागळे, भास्कर गाडगे, संतोष चव्हाण, माजी सभापती रघुनाथ लेंडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, तानाजी तांबे, दिलीप डुंबरे, संभाजी काळे, सचिन वाळुंज, संतोष घोटणे, दत्ता शिंदे, सरपंच मेघा काकडे, संगीत वाघ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सोनवणे यांनी सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर जोरदार टीका केली. ‘जिल्हाधिकारी आणि आमदारांना विचारल्याशिवाय जागेचा प्रस्ताव पाठवता येत नाही, असा शासनाचा जीआर आहे. माझी परवानगी न घेता प्रस्ताव कसा पाठवला,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, ‘१० एकर जमीन ३० कोटींना दाखवली, प्रत्यक्षात ७.५० कोटींना खरेदी केली. साडेबावीस कोटींचा गैरव्यवहार झाला असून, ३ कोटी रुपये पाकिटे वाटण्यासाठी ठेवले आहेत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकी अंगावर ओवाळून टाकेन; पण हा व्यवहार रद्द करणार,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
काळे यांच्यावर आरोप
सोनवणे यांनी संजय काळे यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘काळे यांनी बाजार समितीच्या वार्षिक सभेत १५-२० पोरे घेऊन स्टाइल केली, संचालकांवर धावून गेले. त्यांना खुलं आव्हान आहे, ती मुले घेऊन या, यातील एक पोरगा घरी गेला तर बापाचं नाव सांगणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. तसेच, ‘संचालकांना बोलू न देणे हा कोणता कायदा? माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पोटचे असाल तर खुली सभा घेऊन दाखवा,’ असे आव्हानही त्यांनी दिले.
उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार
गुरुवारी उद्घाटन झालेल्या १३ एकर जागेच्या सोहळ्यावर सोनवणे यांनी बहिष्कार टाकला. ‘पापाचा घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला आयुष्यात कधीच जाणार नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला. तसेच, ‘जुन्नरचे गाळे विकले, मोठे मार्केट असताना सर्व काही ओस पडले आहे. काळे यांच्यामुळे १५-२० कोटींचे नुकसान झाले आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
पणन मंत्र्यांना आवाहन
सोनवणे यांनी सांगितले की, हा १० एकरचा व्यवहार रद्द व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ‘पणन मंत्र्यांनी तात्पुरता स्टेटस-को दिला आहे. हा व्यवहार रद्द करा, २० एकर गायरान जागा एक रुपया भाडेतत्त्वावर देण्याची जबाबदारी आपली आहे,’ असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विरोधकांना इशारा देताना ते म्हणाले, ‘चोराला पक्ष म्हणून मदत करू नका, नाहीतर तुमचेही भांडे उघडे पडेल.’
निवेदन सादर
जमीन खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोनवणे यांनी तहसीलदार डॉ. सुनील शेळके आणि सहायक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांना सादर केले.
शेतकऱ्यांचे नेतृत्व करणार
‘शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांचे नेतृत्व स्वतः करणार, १ रुपयाचा सेझ शेतकरी देणार नाही आणि बाजार समितीला टाळे ठोकणार,’ असा इशारा सोनवणे यांनी दिला. ‘काळे यांची सत्ता घालवणार आणि त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार,’ असेही त्यांनी ठणकावले.