विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:35 IST2025-06-23T12:34:43+5:302025-06-23T12:35:04+5:30

लग्नानंतर ८ वर्षांनी सासू सासूने विवाहितेला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली

Physical and mental torture by mother-in-law for saying that dowry was less in marriage; Highly educated woman's extreme step | विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल

विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल

पुणे: हुंड्यासाठी सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात घडली. याप्रकरणी सासूविरोधात काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका प्रमोद जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि प्रमोद जाधव यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दीपिकाने कृषीविषयक पदवी मिळवली आहे. लग्नानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा पती शासकीय कार्यालयात लिपिक आहे. त्यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर सासू द्वारका हिने दीपिकाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यात आले. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. छळ असह्य झाल्याने दीपिकाने शुक्रवारी (दि. २०) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार पुढील तपास करत आहेत.

Web Title: Physical and mental torture by mother-in-law for saying that dowry was less in marriage; Highly educated woman's extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.