पेट्रोलचा भडका; थेट ३ रुपये दरवाढ, एका घरात एकाहून अधिक दुचाकी, पुणेकरांचे बजेट कोलमडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:24 IST2026-05-16T16:22:57+5:302026-05-16T16:24:34+5:30
वाढत्या इंधन खर्चामुळे भाजीपाला आणि किराणा मालाच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे, त्यामुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात सात ते दहा टक्क्यांनी वाढ होऊ शकते

पेट्रोलचा भडका; थेट ३ रुपये दरवाढ, एका घरात एकाहून अधिक दुचाकी, पुणेकरांचे बजेट कोलमडले!
पुणे : शहरात दुचाकी व पेट्रोल ही आता केवळ वाहन आणि इंधन राहिलेले नसून मध्यमवर्गीयांच्या जीवनमानाची अनिवार्य गरज बनली आहे. अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि वाढते शहरीकरण, यामुळे पुण्यात आज प्रत्येक घरात दुचाकींची संख्या एकाहून अधिक आहे. शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दुचाकीला ऑफिस, कॉलेज आणि घरगुती कामांसाठी महिन्याला सरासरी २५ लिटर पेट्रोल लागते. अशातच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ झाल्याने सामान्य पुणेकरांचे मासिक आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
पेट्रोल, दूध आणि खाद्यतेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या दरात एकापाठोपाठ एक झालेल्या वाढीमुळे पुणेकरांच्या मासिक बजेटची संपूर्ण घडी विस्कटली आहे. मध्यमवर्गीयांना या महागाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे भाजीपाला आणि किराणा मालाच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. कुटुंबाच्या मासिक खर्चात सात ते दहा टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यामुळे बचतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पेट्रोल मध्ये दरवाढ होऊनही शहरातील पेट्रोल पंपांवर नेहमीप्रमाणेच सामान्य स्थिती आणि गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल खरेदी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिक शांतपणे, पण मनात संताप व्यक्त करत इंधन भरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पुण्यात अजूनही या आवाहनाचा कोणताही परिणाम दिसत नाही.
वस्तू-सध्याचा सरासरी मासिक खर्च == नव्याने होणारी दरवाढ == आताचा मासिक खर्च
किराणा माल व धान्य == ८००० == ८०० == ८८००
पेट्रोल (तीन दुचाकी) == ७८०० == २२५ == ८०२५
दूध (४५ लिटर) == ३००० == ९० == ३०९०
खाद्यतेल == ११०० == १५० == १२२०
भाजीपाला व फळे == ३००० == २०० == ३२००
एलपीजी गॅस व वीजबिल == २००० == १०० == २१००
एकूण == २४९०० == १५६५ == २६४६५
कुटुंबाकडे असणारी दुचाकींची संख्या == लागणारे सरासरी पेट्रोल (लिटरमध्ये) == प्रति महिना जास्तीचा खर्च (रुपयांमध्ये) == वार्षिक जास्तीचा खर्च (रुपयांमध्ये)
एक दुचाकी == २५ लिटर == ७५ == ९००
दोन दुचाकी == ५० लिटर == १५० == १८००
तीन दुचाकी == ७५ लिटर == २२५ == २,७००
भाजीपाल्यापासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळंच आधीच महागलं आहे. आता पेट्रोल तीन रुपयांनी वाढल्याने आमच्या घरात तीन गाड्यांचे मिळून महिन्याला २००-२५० रुपये अतिरिक्त जातील. मुलांचे शिक्षण, दूध आणि घरखर्च सांभाळताना गृहिणींना आता इतर खर्चात कपात करावी लागणार आहे. -रोहिणी शाह, गृहिणी.
माझे घर धायरीला आहे आणि ऑफिस शिवाजीनगरला आहे. माझ्या नोकरीत मला रोज दुचाकीने ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. पुण्यात बस वेळेवर मिळत नाही आणि मेट्रो अजून आमच्या भागात आलेली नाही. दुचाकी चालवण्याशिवाय पर्यायच नाही. या दरवाढीमुळे नोकरदार वर्गाचे कंबरडे मोडले आहे. - पवन सुरजुसे, रोज दुचाकीने प्रवास करणारे कर्मचारी.
सरकार जो दर निर्धारित करेल त्याच दराने पेट्रोल विक्री करने आम्हाला भाग आहे. जो दर सांगितला जातो, तोच आम्ही लावतो. - ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे.