पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; जागीच मृत्यू , जेजुरी रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:15 IST2025-11-18T15:15:19+5:302025-11-18T15:15:36+5:30
या भीषण धडकेत व्यक्तीच्या डोक्याला, पायाला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; जागीच मृत्यू , जेजुरी रस्त्यावरील घटना
नीरा : नीरा (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात चालत जाणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शशीकांत मधुकर काळे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून आधी नीरा दुरक्षेत्रात व नंतर जेजुरी पोलीसांत या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी गणेश शशीकांत काळे (वय २७, रा. नीरा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील शशीकांत मधुकर काळे हे आज मंगळवारी (दि.१८) सकाळी साधारण सहा ते सव्वासहाच्या दरम्यान नीरा बसस्टँडजवळून जेजुरी रोडवरील डाव्या बाजूच्या लेनजवळून पायी जात होते. त्यावेळी लोणंदकडून जेजुरीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बेफिकीरपणे व अति वेगात येत पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेत काळे यांना डोक्याला, पायाला व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक न थांबता पसार झाला. याप्रकरणी गणेश काळे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७९/२०२५ प्रमाणे बी.एन.एस. १०६(१), २८१, १२५(AB) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा तपास ग्रेड फौजदार रविराज कोकरे यांच्याकडे असून, फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे नीरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.