Only five and half years child girl have cross the big bhima river | 'सुपरडुपर' कामगिरी! साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने दुथडी भरुन वाहणाऱ्या भीमेला केले लीलया'पार'

'सुपरडुपर' कामगिरी! साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने दुथडी भरुन वाहणाऱ्या भीमेला केले लीलया'पार'

सखाराम शिंदे - 

पुणे (राहू) : भीमा नदीचे विशाल पात्र तसे नेहमीच छातीत धडकी भरवणारे आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचेही अगदी कस पाहणारे ठरते. आणि त्यात सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तर नदीने दुथडी भरून वाहताना रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या नदीच्या पात्रात पोहण्याचा विचार भल्याभल्यांच्या मनाला शिवत देखील नाही.पण त्याला अपवाद ठरली आहे अवघ्या साडेपाच वर्षांची चिमुकली...तिने ज्याप्रकारे भीमा नदीच्या विशाल पात्राला कवेत घेण्याचे धाडस दाखवले अन् ते लीलया 'पार' सुद्धा केले.  

कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील अवघ्या साडेपाच वर्षाची रोशनी आव्हाळे ह्या चिमुरडीचे नाव आहे. मुसळधार पावसाने भीमा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. या पुराच्या पाण्यात मोठे पूल वाहून गेले. पाण्याचे रौद्ररुप पाहून इतरांच्या काळाजाचा ठोका चुकविणाऱ्या पाण्यात रोशनी अगदी सहजरित्या भीमा नदीचे पात्र पोहत पार करण्याची अचाट कामगिरी केली. तिचे हे धाडस पाहून परिसरातील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.

रोशनी आव्हाळे हिने आपले वडील महेश आव्हाळे यांच्याबरोबर दीड वर्षांची असताना नदीमध्ये पोहण्यास सुरुवात केली आणि अवघ्या तीन वर्षांत तिने आपल्या वडिलांसोबत नदीचे पात्र पार केले आहे. मात्र, सध्या होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडीभरून एवढे पाणी वाहत असताना रोशनी भीमा नदी पार करत असल्याने तिचे सर्वत्र गुणगौरव होत आहे.

याबाबत रोशनीचे वडील महेश आव्हाळे म्हणाले की, रोशनी पंधरा महिन्यांची असल्यापासून तिला पोहण्यासाठी भीमा नदीपात्रात नेत होतो. सुरुवातीपासूनच  पाण्याबाबत तिच्या मनामध्ये भीती नव्हती. त्यामुळे ती नक्की पोहायला शिकेल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला. वयाची दोन वर्षे पूर्ण होतानाच ती पोहायला शिकली. स्वत: हून ती नदीच्या खोल पाण्यात पोहायला लागली. अर्थात तिची पाण्याबद्दलची भीती संपली होती. तिच्या या लहान वयातल्या कर्तबगारीमुळे गावातील अनेक लहान मुल-मुली पोहायला शिकली.

................

 ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी रोशनीला पूर्ण मदत करणार.. 

तिचे वाढते धाडस विचारात घेता आता सध्या परतीचा मुसळधार पाऊस होत असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. आणि रोशनीचे धाडस पाहण्याची ही नामी संधी आहे म्हणून तिला नदी पार करण्यासाठीं विचारले असता तिने झटकन होकार दिला. वस्तुत: ही नदी पार करण्याचे माझेही धाडस नव्हते. परंतु, रोशनी हो म्हणाल्यामुळे घाबरत घाबरत मला तिला होकार द्यावा लागला अफाट जिद्द आणि प्रचंड धाडसामुळे तिने हे भीमेचे दुथडी भरून वाहणारे व अंगावर येणारे विशाल पात्र पार केले. भविष्यात रोशनीला पोहण्यामध्ये करियर करण्याची माझी इच्छा असून ऑलिम्पिकसाठी तयारी करण्यासाठी तिला पूर्ण मदत करणार आहे.

महेश आव्हाळे, वडील

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Only five and half years child girl have cross the big bhima river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.