कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:43 IST2025-03-19T16:42:18+5:302025-03-19T16:43:02+5:30
कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही जण सुखरूप वाचले पण चौघांचा होरपळून मृत्यू झाला

कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत
पुणे: आयटीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. यामध्ये, चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच पुढील बाजूस असणारे कर्मचारी बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने चौघांचा दुर्दैवी अंत झाला. कंपनीत सुखरूप पोहचायला केवळ दोन मिनिटांचा फरक पडला अन्यथा जीव वाचले असते अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती.
मिळालेल्या माहिती नुसार, सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (वय ५८, रा. नऱ्हे), गुरूदास लोकरे (वय ४०, रा. हनुमान नगर, कोथरूड), राजू चव्हाण (वय ४०, वडगाव धायरी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, वय ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (वय.३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (वय.५२, रा. कोथरूड), विश्वास खानविलकर (पुणे), प्रविण निकम (वय ३८), चंद्रकांत मलजी (वय ५२, रा. दोघेही कात्रज) अशी जखमी झालेल्यांची असून, विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदिप राऊत हे सुखरूप बाहेर पडले आहेत.
फेज एक मधील विप्रो सर्कल पासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस टेम्पोला अचानक आग लागली. चालक आणी पुढील बाजूला असणारे कर्मचारी खाली उतरले मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.