खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 21:04 IST2025-05-15T21:03:56+5:302025-05-15T21:04:34+5:30

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे

Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens | खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा; नागरिकांसाठी चिंतेची बाब

आसखेड (खेड तालुका) : चार तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन १० एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्यात आले. त्यासाठी १ हजार २०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस १२०० क्युसेकने सोडण्यात आले होत. या पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूरमधील ४, हवेलीमधील ४ तर दौंडमधील ६ बंधारे (एकूण २४ बंधारे) भरण्यात आले. परंतु, त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला. परंतु, गेले दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधाऱ्यांतील पाणी किमान ७ ते ८ दिवस वापरले जाणार नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत पावसाने दडी मारली तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी व्यक्त केला आहे.

यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दलघमी (१.६३ टीएमसी) इतका असून, धरणसाठा १५.०९ टक्के आहे तर गतवर्षी २०.१५ टक्के इतका होता.
भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे. या ३३ दिवस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे २४ बंधारे भरले. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असूनही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेला अडचण येणार नाही.

Web Title: Only 15 percent water storage in Bhama Askhed Dam in Khed taluka; A matter of concern for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.