पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू; बारामती तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:11 IST2025-10-03T10:11:45+5:302025-10-03T10:11:45+5:30
वायरमधून करंट लागल्याने हा अपघात घडला असून त्यांचे वडील सुदैवाने बचावले

पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू; बारामती तालुक्यातील घटना
मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोली येथील तुकाईनगर वस्तीत बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरगुती पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का बसून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत तात्यासो संपत मासाळ (वय ३३, रा. तरडोली) यांचा मृत्यू झाला आहे.
मोरगाव पोलिस मदत केंद्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तरडोली गावच्या हद्दीत, पवारवाडी ते लोणी भापकर मार्गावरील तुकाईनगर वस्तीत घडली. तात्यासो मासाळ हे त्यांचे वडील संपत खंडू मासाळ यांच्यासोबत शेतातील बोरवेलची मोटर सुरू करण्यासाठी वायरचा जोड देत होते. यावेळी वायरमधून करंट लागल्याने हा अपघात घडला. तात्यासो यांना विजेचा जोरदार धक्का बसला, तर त्यांचे वडील सुदैवाने बचावले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुपा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.