लग्नासाठी निघालेल्या वडील मुलाला ट्रेलरची धडक ; मुलगा मृत्यूमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:23 IST2018-12-09T18:22:24+5:302018-12-09T18:23:55+5:30
हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

लग्नासाठी निघालेल्या वडील मुलाला ट्रेलरची धडक ; मुलगा मृत्यूमुखी
लोणी काळभोर : हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात दिपक उत्तम तुपे ( वय ४९ ) हे मृत्यूमुखी पडले आहेत तर त्याचे वडील उत्तम साधू तुपे ( वय ७८, दोघेही रा. अॅमनोरा पार्क, तुपे कॉलणी, माळवाडी, हडपसर, पुणे २८ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी उत्तम तुपे यांचे चुलत भाऊ प्रवीण सादबा तुपे यांनी दिलेल्या फियार्दी वरून फरार झालेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक आणी त्यांचे वडील उत्तम तुपे हे शनिवार (८ डिसेंबर ) रोजी सायंकाळी आपली स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ५६८३ वरून एका विवाह समारंभासाठी ऊरूळी देवाची गावचे हद्दीतील एका कार्यालयात निघाले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते हडपसर - सासवड राज्यमार्गावरील हॉटेल सोनाई समोर आले असता त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलर क्रमांक एमएच १२ एलटी ९९०९ ने धडक दिली. यांमुळे दुचाकी वर असलेले पिता - पुत्र दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. तेथे जमलेल्या लोकांनी त्या दोघांना उपचारासाठी तात्काळ हडपसर येथे असलेल्या एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दिपक उत्तम तुपे हे मयत झाले आहेत तर त्याचे वडील उत्तम तुपे यांचे बरगडी व उजव्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. अपघात झालेनंतर ट्रेलर चालक फरार झाला आहे. पुढील तपास ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.