पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा अजूनही पडून; बँकेसमोर २२ कोटी जपण्याचे आव्हानच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:35 AM2021-07-08T11:35:20+5:302021-07-08T11:35:31+5:30

जुन्या नोटांमुळे बॅंकेला सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे आर्थिक झळ सोसावी लागली आहे

Old 500 and 1000 notes still lying with Pune District Central Bank; The challenge before the bank is to save Rs 22 crore | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा अजूनही पडून; बँकेसमोर २२ कोटी जपण्याचे आव्हानच

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा अजूनही पडून; बँकेसमोर २२ कोटी जपण्याचे आव्हानच

Next
ठळक मुद्देनोटांच्या देखभालीसाठी बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे

पुणे: भारतीय चलनातून २०१६ साली ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने या नोटा बदलून देण्यासाठी सर्वांना विशिष्ट कालावधीही दिला होता. पण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक याला अपवाद ठरली असून ५७६ कोटींच्या जुन्या नोटा सुरवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. महत प्रयत्नांनंतर यापैकी ५५४ कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. तोपर्यंत बॅंकेचे ५० कोटींचे आर्थिक नुकसान झाले. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत. जुन्या नोटांमुळे बॅंकेला सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे आर्थिक झळ सोसावी लागली आहे. आता या शिल्लक नोटा जपून ठेवण्याचे बँकेसमोर आव्हानच असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु कोरोनामुळे अंतिम निकाल बाकी राहिला आहे. यामुळं बॅंकेने या जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवून त्यांचा वाळवी व अन्य किडीपासून बचाव केला जात आहे. आज ना उद्या या नोटा बदलून मिळतील, या आशेने काळजाच्या तुकड्याप्रमाणे या जुन्या नोटांची जपणूक केली जात असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात सांगत होते.

या नोटांच्या देखभालीसाठी बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत लागत आहे. चुक केंद्र सरकारची आणि शिक्षा  जिल्हा बॅंकेला भोगावी लागत आहे. परंतु बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ही झळ सोसता आली. पण याचा ढोबळ नफ्यावर मोठा परिणाम झाल्याची भावनाही थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

जुन्या नोटा सुस्थितीत जपून ठेवण्याचे आव्हान जिल्हा बॅंकेसमोर

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबरला सर्व बॅंकांना सुट्टी देण्यात आली. या सुट्टीमुळे ८ नोव्हेंबरला जमा झालेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकेचे अधिकारी १० नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी गेले. परंतु आमच्याकडे जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत या बॅंकांनी हे पैसे जमा करून घेतले नाहीत. तसे त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या पत्राच्या आधारे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मात्र कोरोनामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी या निर्णयापर्यंत या जुन्या नोटा सुस्थितीत जपून ठेवण्याचे आव्हान जिल्हा बॅंकेसमोर आहे.

Web Title: Old 500 and 1000 notes still lying with Pune District Central Bank; The challenge before the bank is to save Rs 22 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.