बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:53 IST2025-07-29T17:52:21+5:302025-07-29T17:53:14+5:30
शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला

बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?
शिरूर : स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या सयुक्त पथकाने तालुक्यात अवैध धंद्यांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व तीन लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे.
शिरूर येथील गुलमोहर अपार्टमेंट, बुरूड आळी येथे शुक्रवारी (दि. 25) रोजी रफिक चाँद शेख ( ३६) याच्या घरावर छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांचा तीन लाख ५६ हजार सातशे ८१ रुपये किंमतीचा गुटखा, तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दोघेजण मोटारसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी आमदाबाद फाट्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली. शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोटारसायकलसह शुभम शंकर मोहीते (२९) व विजय केमराज काळे ( २९, दोघे रा. टाकळीहाजी) यांना तब्यात घेण्यात आले. तिसरी कारवाई दि. २६ जुलै रोजी रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (३३, रा. कामाठीपुरा, शिरूर) येथे छापा टाकून त्याच्या घरातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी रमेश उर्फ रमन याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.