पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:04 IST2025-04-29T12:02:58+5:302025-04-29T12:04:42+5:30
जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल, पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा

पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती
पुणे: जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर, तर पुढील पाच वर्षांत एक कोटीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल. पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण सोमवारी (दि. २८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदींसह मंत्रालय आणि जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लोककला, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीची अमर्याद संधीचा उपयोग करून जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तयार केला आहे.
यात जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ग्रॅन्डसायकलिंग चॅलेंज स्पर्धा, बारामती व इंदापूरला हॉटएअर बलून फेस्टिव्हल, पवना धरणक्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास, जिल्ह्यातील कलावंतांच्या सहभागातून गायन, वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनासारख्या सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबरोबरच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या ‘मोटरबोटिंग’, ‘झिपलाइन’सारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे.
पवार म्हणाले की, जिल्ह्यानेही पर्यटन विकासात आघाडीवर असलं पाहिजे. यातून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर जिल्ह्याचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल. जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित नामांकित, तज्ज्ञ व्यक्ती, संस्था, संघटनांचे सहकार्य घ्यावे. राज्य सरकारकडून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल. निधीची कमी भासू दिली जाणार नाही.
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा आणि सिंहगड किल्ला समर्ग संवर्धन विकास आराखड्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. किल्ले प्रतापगडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी अतुलनीय शौर्य, साहस आणि निष्ठेचे दर्शन घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, जिवाजी महाले यांच्या प्रतापगड पायथा परिसरातील पुतळा आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.