राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:27 IST2026-01-05T13:25:33+5:302026-01-05T13:27:27+5:30
‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे.

राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती
पुणे: ज्यांना कुठल्याही पक्षांकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका, पीएमपी आहे... त्यांना आम्ही थेट बसचे तिकीट देतो. पीएमपीचे तिकीट ऑनलाइनही उपलब्ध आहे. रांगेत उभे राहायची गरज नाही..पीएमपीला प्राधान्य द्या..राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...त्यांना आम्ही थेट बसचं तिकीट देतो. वेळेवर बस, आरामदायक प्रवास आणि कमी ताण हे आमचं आश्वासन...पीएमपी निवडा..मत नको तिकीट पुरे.. पक्ष बदल नाही..फक्त थांबे बदल अन् सुरक्षित प्रवास..अशा आशयाने पीएमपीकडून प्रवासी आणि मतदार जगजागृती करण्यात येत आहे.
निवडणुकीचा हंगाम सुरू झाला की, तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ, नाराजी, पक्ष बदल आणि राजकीय गोंधळ हा ठरलेलाच असतो. मात्र, याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हटके आणि पुणेरी टोमण्यांची जोड देत थेट मतदारांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. ‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. तसेच ‘राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट पक्कं’, ‘मत नको, तिकीट पुरे’, ‘पक्ष बदल नाही…फक्त थांबे बदल’ अशा मिश्कील शैलीतून पीएमपीकडून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व पटवून देत आहे. या संदेशांमधून वेळेवर बस, आरामदायक प्रवास आणि कमी ताण हे आमचे आश्वासन असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘पीएमपी पक्षाचे तिकीट आता ऑनलाइन’ही उपलब्ध असल्याने रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचा पुणेरी शैलीतून आवाहन करण्यात येत आहे.
सकारात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित
निवडणूक काळात राजकीय वातावरण तापलेले असताना, पीएमपीने थेट वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत सकारात्मक संदेश प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पुणेरी भाषेतील ही शब्दशैली सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आली असून, अनेकांनी या कल्पकतेचे स्वागत केले आहे. आशय आणि वेगळ्या धाटणीतून प्रवाशांमध्ये वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पीएमपी किती महत्त्वाची आहे, याचा संदेश पोहोचण्याचे काम पीएमपी करत आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे प्रवासी, मतदार यांच्यामध्ये जनजागृती मोहीम केवळ विनोदापुरती नसून, नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरावी, वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्राधान्य मिळावे, हा या मागचा उद्देश आहे.- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी