दुःखद प्रसंगी स्वतःच राजकारण कुणीही या विषयावर करू नये; विमान अपघात घटनेवरून मोहोळ यांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:34 IST2026-02-07T15:32:21+5:302026-02-07T15:34:36+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले असून सीआयडी चौकशी लावली आहे, लवकरच सर्व अहवाल समोर येतील

दुःखद प्रसंगी स्वतःच राजकारण कुणीही या विषयावर करू नये; विमान अपघात घटनेवरून मोहोळ यांची विनंती
पुणे : बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक हरहुन्नरी असा कामाचा माणूस महाराष्ट्राने गमावला. त्यानंतर या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या सखोल चौकशीची मागणीही राजकीय व्यक्तींकडून केली जात आहे. यावरून राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. दुःखद प्रसंगी स्वतःच राजकारण कुणीही या विषयावर करू नये अशी विनंती त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केली आहे.
मोहोळ म्हणाले, अपघातानंतर चौकशी सुरु आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. एआयबीची टीम यावर काम करत आहे. त्याचा डाटा डाऊनलोड होत आहे. याच सगळ विश्लेषण व्यवस्थित होईल. आणि लवकरात लवकर याचा सगळा अहवाल समोर येईल. कृपया कोणीही याबाबत राजकारण करू नये अशी विनंती आहे. रोहित पवार त्यांचं म्हणणं मांडतील. चौकशी होऊन अहवाल समोर येतील. मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष घालत आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मागणी करत सीआयडी चौकशी लावली आहे. देवेंद्रजींनी स्वतः याबाबत केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. DGCI आणि AIB यावर काम करत असल्याने सगळं लवकरच समोर येणार आहे.
दादा गेल्याचं दुःख मनामध्ये आहे
जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी होती, मी कुठेही प्रचाराला गेलो नाही. अशा वेळी प्रचार करणे योग्य वाटत नाही. मतदार सुज्ञ आहेत, त्यांना जे करायच ते करतील.अनेक दिवस राष्ट्रवादीची सत्ता आहे. जो काही होईल ते होईल. अजित दादा पुणे जिल्ह्यात ३५ ते ४० सभा घेणार होते. दादा गेल्यानंतर आम्हाला रस नाही. निवडणुका येतात आणि जातात. दादा गेल्याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे.
पुण्याला देशातील सर्वात चांगले शहर बनवू
गेली ३- ४ वर्षे पुणे शहरला प्रतिनिधी नव्हते. आता नवीन व्यवस्था अस्तित्वात येतेय. मला विश्वास आहे, चांगल काम केल जाईल, आमची जबाबदारी वाढली आहे. आमची माणस चांगले काम करतील असा विश्वास आहे. सामान पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था यावर काम कराव लागणार. पुण्याला देशातील सगळ्यात चांगले शहर बनवू.