Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:06 IST2025-11-14T10:05:01+5:302025-11-14T10:06:39+5:30
नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला

Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी
पुणे: गेल्या आठ वर्षांत नवले पूल परिसरात २१० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये ८२ पेक्षा अधिक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. यामध्ये प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. आणखी किती निष्पापांचे बळी घेणार आहात? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजना नसल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत.
वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे जातो. आतापर्यंत ८२ पेक्षा अधिक लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. महामार्गावरील अपघातांमागे अनेकदा वाहनचालकांचा हलगर्जीपणा, वाहनांचे ब्रेक फेल होणे, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशी कारणे समोर येतात. मात्र, ८ कि मी.चा तीव्र उतार हेच प्रमुख कारण असून हा उतार कमी करणे हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे अथवा रिंग रोड तयार करून अवजड वाहतूक शहराबाहेरून करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
मरण एवढे स्वस्त झाले का?
नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.इथे सर्वसामान्य माणसाच्या जिवाची काहीच किंमत नाही का? अजून किती निष्पाप लोकांचे जीव घेणार आहात? मरण एवढे स्वस्त झाले आहे का? असे संतप्त सवाल पुणेकर करत आहेत.
सावधान! पुढे नवले पूल आहे
नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात. परंतु, अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होते. चर्चा, बैठका होतात अन् त्यानंतर पुन्हा काहीच होत नसल्याचा आरोप करत प्रवासी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. त्याबरोबरीने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गावर ‘सावधान, पुढे नवले पूल आहे’ अशा आशयाचे फलक महामार्गावर लावले. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना सोडता प्रशासनाने कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत.