पुणे : दिवार चित्रपटातील अभिताभ बच्चनच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ गोंदलेला सीन आठवतोय, अगदी त्याच स्टाईलमध्ये एका शिक्षिकेने छोट्या मुला-मुलींच्या हातावर भल्या मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे पेनाने लिहून त्यांना मैदानावर पळत चार चक्कर मारण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मुले प्रचंड घाबरली आणि आपला हात कोणी पाहू नये यासाठी दिवसभर हात लपवत त्यांनी शाळेतील दिवस काढला.
धनकवडी परिसरातील अनंत निर्मल ग्लोबल स्कूलमध्ये ही घटना बुधवारी घडली. याबाबत काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना लेखी तक्रार केली. परंतु मुख्याध्यापिकांकडून संबंधित शिक्षिकेला तोंडी सूचना देण्याव्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेची माहिती अशी की, धनकवडी परिसरात अनंत निर्मल ग्लोबल स्कूल ही मोठी शाळा आहे. पहिली दुसरीच्या मुलांसाठी येथे ३० ते ४० हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे मुलांना प्रशिक्षित, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास असणारे शिक्षक असल्याची पालकांची अपेक्षा आहे. सकाळी आठ वाजता शाळा भरली. त्यानंतर काही वेळात येथील क्रीडा शिक्षकांनी मुलांची शिस्तीची तपासणी केली. ज्या मुलांची नखे वाढली आहेत त्यांचा हात पकडून त्यावर मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे लिहिले व ज्या मुलांनी केस कापले नाही, नखे कापली नाहीत त्यांना शाळेच्या क्रीडांगणाची पळत चार चक्कर मारायची शिक्षा दिली.
हातावर पेनाने लिहिलेल्या ‘नेल कट’ अक्षरांमुळे चिमुकली मुले प्रचंड अस्वस्थ होती. त्यामुळे दुपारी पालक आल्यानंतर त्यांना रडवेल्या तोंडाने हात दाखविला, आम्हाला या शाळेत पाठवू नका प्लीज अशी विनवणी केली, त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. पालकांनी मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली, परंतु त्यांनी याबाबत सारवासारवीची उत्तरे देत पालकांना पाठवून दिले.
प्रत्येक क्लासमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्यावर शिक्षकांकडून नियमित सूचना येतात, शिवाय मुलांच्या बॅगमध्ये नोटीस डायरी सुद्धा आहे, त्याचे पैसे शाळेने घेतले आहेत. त्या डायरीत नोटीस लिहिणे गरजेचे होते, विद्यार्थ्यांच्या हातावर अशी सूचना दिल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शाळेवर कारवाई झाली पाहिजे. - पालक
पालकांची तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित शिक्षिकेला तोंडी सूचना केल्या आहेत, शाळा सुटताना हा प्रकार झाला होता, याबाबत संस्थेला घटनेची माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात येईल. -मनिषा धावडे, मुख्याध्यापिका
Web Summary : A Pune teacher punished students with long nails by writing 'Nail Cut' on their hands and making them run laps. Parents complained, citing emotional distress. The headmistress issued a verbal warning.
Web Summary : पुणे में एक शिक्षिका ने लंबे नाखूनों वाले छात्रों को 'नेल कट' लिखकर सज़ा दी और दौड़ लगवाई। अभिभावकों ने भावनात्मक पीड़ा का हवाला देते हुए शिकायत की। प्रधानाध्यापिका ने मौखिक चेतावनी दी।