चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; सिंहगड रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:05 IST2020-05-16T20:59:33+5:302020-05-16T21:05:15+5:30
रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; सिंहगड रोडवरील घटना
पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीला चाकूने भोसकून खून केल्याची घटना सिंहगड रोडवरील धायरी येथे घडली. ही घटना धायरीतील महादेवनगर येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली़.वृषाली संतोष सुरगुडे (वय २९, रा. महादेवनगर, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष रामचंद्र सुरगुडे (वय ३२) याला सिंहगड रोडपोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संतोष सुरगुडे हा एका पावडर कोटिंग कंपनीत काम करतो. तर, त्याची पत्नी एका खासगी कंपनीत काम करत होती. त्यांचा ८ वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना एक मुलगी आहे. संतोष यांचा भाऊ व इतर कुटुंबीय वरच्या मजल्यावर राहतात.लॉकडाऊनमुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून घरातच होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. पत्नीचे पोट दुखत असल्याने संतोषने तिला सकाळी दवाखान्यात नेले होते. त्यानंतर दुपारी ते दोघे झोपले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात संतोष याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. पत्नीचा आरडाओरडा ऐकून वरच्या मजल्यावरील त्यांचे भाऊ व इतर खाली आले.तेव्हा पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी संतोष सुरगुडे याला ताब्यात घेतले आहे.