गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:35 IST2026-02-16T17:34:57+5:302026-02-16T17:35:10+5:30
खुनाचे खरे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसून, या घटनेचा चाकण उत्तर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी युवकाचा खून; चाकण शहरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात
चाकण : चाकण शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी मच्छीमार्केटच्या समोरील गल्लीत राजगुरुनगर येथील एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. १४) दुपारी घडली. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रथमेश माने (रा.राजगुरुनगर, ता.खेड, जि.पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच, चाकण उत्तर पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संबंधित युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खुनाचे खरे कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसून, या घटनेचा चाकण उत्तर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात बिरदवडी (ता.खेड) येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याचा प्रकारही उघडकीस आला होता.