मुंबई - बंगळुर महामार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:53 IST2021-08-18T13:50:53+5:302021-08-18T13:53:53+5:30
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने डंपरचालकास अटक

मुंबई - बंगळुर महामार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
धायरी : मुंबई - बंगळुर महामार्गावर डंपरच्या चाकाखाली सापडल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. नेमीचंद दुर्गाराम सुधार ( वय ५२, रा. वेदगौरव अपार्टमेंट, दुधाणे पेट्रोल पंपाजवळ, शिवणे,) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई - बंगळुर महामार्गालगत वडगांव बुद्रुक येथे असलेल्या आर्या रेसिडेन्सी इमारतीच्या समोर घडली. याबाबत पोलीस नाईक नेताजी तानाजी कांतागळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने डंपरचालक अब्दुल रजाक इस्माईल शेख ( वय: ५०, रा. कापूरहोळ, ता. भोर) यांच्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमीचंद सुधार हे आपल्या दुचाकी वरून कामानिमित्त निघाले होते. दरम्यान वडगांव बुद्रुक येथील आर्या रेसिडेन्सीसमोर आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीचालक नेमीचंद हे खाली पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून डंपरचे पुढील चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव हे करीत आहेत.