Revati Sule Marriage: खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती होणार नागपूरची सून; कोण आहेत सारंग लखानी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:55 IST2026-02-11T10:51:50+5:302026-02-11T10:55:20+5:30
रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली

Revati Sule Marriage: खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती होणार नागपूरची सून; कोण आहेत सारंग लखानी?
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती नागपूरची सून होणार आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाचा मुलगा सारंग लखानी यांच्याशी रेवती यांचे लग्न होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय सुळे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर अभिनंदनपर संदेश पोस्ट करून ही गुड न्यूज दिली आहे. यात रेवती आणि सारंग यांचा फोटो शेअर करीत, "बहीण आणि मेहुणे यांचे अभिनंदन" अशा कॅप्शनसह हार्ट आणि रिंगचे इमोजी मेसेज टाकून सर्वाना सुखद धक्का दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनीही सोशल मीडियावर असाच संदेश आणि फोटो शेअर केला.
रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
कोण आहेत सारंग लखानी?
सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सध्या सारंग लखानी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फर्म विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते उत्तम बॅडमिंटनपटू असून, त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.