वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: April 11, 2025 20:31 IST2025-04-11T20:31:19+5:302025-04-11T20:31:38+5:30
वारजेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर एक मुलगा रात्रपाळीला कामाला गेल्यामुळे वाचला

वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे : वारजे भागात शाॅर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नुकतीच घडली. त्याला जबाबदार असल्याप्रकरणी खोलीमालकाविरोधात वारजे पाेलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नितीन नारायण बराटे (४२, रा. हर्षवर्धन बिल्डिंग, वारजे गावठाण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश मोहन मुडावत (२४, रा. नितीन बराटे चाळ, गोकुळनगर, वारजे माळवाडी) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, वारजे भागातील गोकुळनगर परिसरात नितीन बराटे याची चाळ आहे. चाळीतील पत्र्याच्या खोलीत प्रकाश मुडावत, त्याचे वडील मोहन आणि मोठा भाऊ पप्पू हे राहायला आहेत. वर्षभरापूर्वी प्रकाश यांच्या आईचे निधन झाले होते. प्रकाश, माेहन, पप्पू हे मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. ९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. प्रकास रात्रपाळीत कामाला गेला होता.
शाॅर्टसर्किट झाल्यानंतर खोलीत आग लागली. आगीत सिलिंडरने पेट घेतला. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग भडकली. आगीत प्रकाशचे वडील मोहन आणि भाऊ पप्पू गंभीर होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वारजे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. पत्र्याच्या खोलीत खिडकी नव्हती, तसेच बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता. पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चाळमालक नितीन बराटे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रणजित मोहिते तपास करत आहेत.