Morning walk death in two-wheeler accident | दुचाकी धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा मृत्यू
दुचाकी धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा मृत्यू

ठळक मुद्देवानवडीतील घटना : गेल्या दहा दिवसांत तीन अपघात; तिघांचा गेला नाहक बळी

पुणे : शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या व्यक्तीला मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला.
या अपघातात ज्येष्ठ नागरिक रघुनाथ शंकर बधे (रा. वानवडी) यांचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार अवनित विनोद भंडारी (वय ४०, रा. साळुंखे विहार) ही व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरकर रस्त्यावरील हॉटेल साई सागर येथून रघुनाथ बधे रस्त्याच्याकडेने चालत असताना फातिमानगर च्या बाजुने येणाऱ्या दुचाकीचालकाने (एमएच. १२. एमजे. ५३६०) मागून येऊन जोरात धडक दिली. त्यामुळे दोघेही जागेवर पडल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता रघुनाथ बधे यांचा मृत्यू झाला, तर चालक हा अतिदक्षता विभागात असून उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार हा दारूच्या नशेत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  अपघाताचा पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
मागील दहा-बारा दिवसांत शिवरकर रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले होते. यामध्ये प्रेमानंद पार्कसमोर दुचाकीस्वाराने पादचाºयाला धडक दिल्याने पप्या गुलाब भालेराव (वय ४०, रा. हडपसर) याचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी रात्री भरधाव रिक्षा विशाल मेगा मार्ट येथील झाडाला धडकल्याने रिक्षाचालक यतिराज संतराम भिसे (वय २९ रा. हेवन पार्क, महंमदवाडी) याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवरकर रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 
.....
मॉर्निंग वाँक’साठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिवरकर रस्त्यावर मागील काही दिवसांत पादचारी व रिक्षाचालकाचा मृत्यू होऊन दहा दिवस उलटले नसताना शुक्रवारी सकाळी पुन्हा भरधाव व दारूच्या नशेत असणाऱ्या दुचाकीचालकाने रघुनाथ बधे यांना धडक दिल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याने वानवडीत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये रस्त्याच्या बाजूने चालण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सकाळी बाहेर पडलेली आपली व्यक्ती सुखरुप घरी येईल ना, याकडेही घरचे लक्ष देऊन असतात, तर काहींना पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी बंधने घालण्यात येत असल्याचे या दहा दिवसांत दिसून आले आहे.
..........
 मदतीसाठी आले नाही कोणी... 
शिवरकर रस्त्यावरील हा अपघात इतका जोरात झाला होता, की मदतीसाठी कोणीही व्यक्ती पुढे जात नव्हती. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या प्रत्यक्षदर्शी डॉ. डिंपल व त्यांची मैत्रीण सकीना यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे या व जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विनवणी करीत होत्या, परंतु पुरुष नागरिक फक्त बघतच बसले होते, असे प्रत्यक्षदर्शी डॉ. डिंपल यांनी सांगितले. या दोन महिलांनी त्यांना होईल तेवढी मदत केली व दुचाकीचालकाच्या घरी फोन करून कळवले होते. ज्येष्ठ काकांना त्यांच्या ओळखीचे लोक येऊन घेऊन गेले.

Web Title: Morning walk death in two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.