मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:14 IST2025-11-21T12:14:23+5:302025-11-21T12:14:59+5:30
गरिबीमुळे त्याने मोठे शिक्षण घेतले नसले तरी केवळ प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याचा मोमोजचा व्यवसाय उत्तम उभा केला होता

मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
पुणे : मुळशी तालुक्याची हद्द संपताच पुणे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ताम्हिणी घाटामध्ये एका थार गाडीचा अपघात होऊन ही गाडी जवळपास 400 ते 500 फूट खोल दरी मध्ये जाऊन कोसळली. या अपघातामध्ये पुण्याच्या उत्तमनगर भागातील ६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. कोकणाच्या हिरव्यागार डोंगरात फिरायला, समुद्राच्या लाटांशी खेळायला निघालेल्या सहा तरुणांचं हसत-खेळत सुरू झालेलं प्रवासाचं स्वप्न... अवघ्या काही क्षणांत चिरडून गेलं. या घटनेत मृत्यू झालेल्या साहील साधू गोटे या तरुणाने २० दिवसांपूर्वीच नवीन थार गाडी घेतली होती.
साहिल गोटे हा अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला, पुण्यातीलच डावजे सोनामधून पोटा-पाण्यासाठी तो कोपरे गावात काही वर्षापूर्वीच आला. पोटा-पाण्यासाठी त्याने मोमोजचा व्यवसाय सुरू केला. शिवणे, सिंहगड रोड, धायरी या ठिकाणी त्याने मोमोजच्या गाड्यांच्या शाखा उघडल्या होत्या. या व्यवसायात त्याला प्रगतीही मिळत होती. त्याच्याबरोबर काम करणारे शिवा माने, श्री कोळी आणि पुनित शेट्टी हे त्याचे जिवाभावाचे सहकारी होते. प्रचंड मेहनत करून त्याने याच व्यवसायाच्या जोरावर गेल्या वर्षीच एक फ्लॅट विकत घेतला आणि सुमारे महिनाभरापूर्वीच ‘थार’ गाडीही घेतली. मात्र, ड्रायव्हिंगचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गाडी चालविणे त्याला नीटसे जमत नव्हते. अशातच नवी गाडी घेऊन ते कोकण दौऱ्यावर निघाले आणि घात झाला. त्यामुळे इतकी वर्षे प्रचंड मेहनतीने जे कमावले ते ड्रायव्हिंगने एका क्षणात गमावले.
मोमोजचा व्यवसाय करून दिवाळीच्या काळात साहिलने नवीन चारचाकी गाडी घेतली होती. साहिलने केलेल्या या प्रगतीचे त्याच्या साऱ्या नातेवाईकांत कौतुक होते. गरिबीमुळे त्याने मोठे शिक्षण घेतले नसले तरी केवळ प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याचा मोमोजचा व्यवसाय उत्तम उभा केला होता. रात्रीपासून मोमोज घरात बनविण्यासाठी तयारी करायची आणि सकाळी आठ वाजता मोमोज विक्री सुरू करायची ते दुपारी बारापर्यंत चालायचे. पुन्हा सायंकाळीही मोमोज विक्रीसाठी उभे राहायचे. त्याच्या मोमोजला चांगली चव असल्याने त्याच्याकडे ग्राहकांची मोठी गर्दी होती. इतक्या वर्षात त्याच्याकडून एकही ग्राहक दुखावला नाही की एकाही ग्राहकाशी कधी त्याचे भांडण झाले नाही. त्यामुळे शिवणे परिसरात त्याची मोठी ख्याती होती.
आईचा जीव कालविला
साहिलच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर साहिलीच्या आईचा जीव कालवला, मात्र या बातमीवर त्यांचा विश्वास बसलाच नाही. साहिल परत येणार आहे, असा त्यांचा विश्वास असल्याने त्या दारात उभे राहून त्याची वाट पाहत होत्या. अपघातात सहा तरुणांच्या मृत्यूच्या बातमीमुळे गावातील अनेक तरुण त्यांच्या घराजवळ जमत होते. साहिलच्या मित्रांच्या या गर्दीत माझा साहिल कुठे दिसतो का, अशा शोधक नजरेने त्याची आई सगळीकडे पाहत होती. या माऊलीची अवस्था पाहून साऱ्यांनाच रडू अनावर झाले होते.