इंदापूर येथे होणार मिनी बालेवाडी स्टेडियम; ५५ कोटींचा निधी मंजूर, कृषिमंत्री भरणेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:53 IST2025-08-07T09:52:46+5:302025-08-07T09:53:11+5:30
निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण

इंदापूर येथे होणार मिनी बालेवाडी स्टेडियम; ५५ कोटींचा निधी मंजूर, कृषिमंत्री भरणेंची माहिती
बारामती: इंदापूर येथे मिनी बालेवाडी स्टेडियम होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल ५५ कोटींच्या निधीस मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण २०१२ अन्वये प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल उभारणे ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सद्यस्थितीत इंदापूर येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु खेळाडू आणि नागरिकांनी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याकरिता तत्कालीन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्यातून कृषिमंत्री भरणे यांनी सदर प्रस्तावास मान्यता घेतली आहे. त्यानुसार सध्याच्या प्रचलित संकुलामध्ये ५५ कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधा उभा करण्याकरिता शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्रास मैदान,व्हॉलीबॉल कोर्ट सिंथेटिक, विविध खेळांचे इनडोअर हॉल,फ्लड्स लाइट्स, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वस्तीग्रह, अंतर्गत रस्ते,अद्यावत व्यायाम शाळा साहित्यसह स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, ट्रॅकच्या दोन्ही बाजूस पवेलियन, सुंदर असे लँडस्केपिंग, पाणीपुरवठा व सोलर, अद्यावत शूटिंग रेंज, स्क्वॉश कोर्ट, क्लब हाऊस, व्हीआयपी कॉन्फरन्स हॉल आदी क्रीडा सुविधांची निर्मिती होईल. बुधवारी (दि ६) शासनाने याबाबत अध्यादेश काढत तालुका क्रीडा संकुलास खासबाब निधी मंजूर केला आहे. या निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.