Pune Metro: पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:47 IST2025-10-01T19:47:27+5:302025-10-01T19:47:40+5:30
स्वारगेट ते पीसीएमसीपर्यंत थेट प्रवासी सेवा असल्यामुळे लांबपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे

Pune Metro: पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर
पुणे : शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून मेट्रोचेप्रवासी सातत्याने वाढत आहेत. जूनमध्ये ५२ लाख, जुलै महिन्यात ५९ लाख, आॅगस्टमध्ये ६९ लाख आणि सप्टेंबर महिन्यात ७५ लाख ९२ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला असून, मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वाधिक ७५ लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर सेवा सुरू आहे. एका दिवसाला साधारण २ लाख ५० हजार नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बेस्ट सफर म्हणून प्रवाशांचा कल मेट्रोकडे दिसत आहे. जानेवारीपासून महामेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढताना दिसत आहे. प्रत्येक महिन्यात किंचित प्रवासी संख्या वाढत होती; पण जून महिन्यात पहिल्यांदाच थेट ४ लाख, तर जुलैमध्ये थेट ८ लाख, आॅगस्टमध्ये १० लाख आणि सप्टेंबर महिन्यात ७ लाख प्रवासी संख्या वाढली आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर लांब पल्ल्याची प्रवासी सेवा सुरू झाल्याने नागरिकांना फायद्याचे ठरत आहे. शिवाय पीएमपीने तिकीट दर वाढविल्याचा फायदादेखील काही प्रमाणात मेट्रोला होत आहे.
पहिल्यांदाच ७५ लाखांवर
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव होता. या काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रोसेवा सुरू होता. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. शिवाय दररोजच्या वाहतूक कोंडीमुळेदेखील मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच स्वारगेट ते पीसीएमसीपर्यंत थेट प्रवासी सेवा असल्यामुळे लांबपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी मेट्रोच्या प्रवासी संख्या वाढण्यास मदत होत आहे.
महिन्यानुसार मेट्रोची प्रवासी संख्या
महिना - प्रवासी संख्या
मार्च - ४४ लाख ८१ हजार
एप्रिल - ४६ लाख ५९ हजार
मे - ४७ लाख ६२ हजार
जून - ५२ लाख ४१ हजार
जुलै - ५९ लाख ५८ हजार
आॅगस्ट - ६९ लाख ४८ हजार
सप्टेंबर - ७५ लाख ९२ हजार