इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:48 IST2025-08-30T16:47:54+5:302025-08-30T16:48:17+5:30
तरुणीच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली

इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख; गर्भपात घडवून आणला, पैसेही लुटले
पुणे: इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची व त्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सौरभ विलास धोत्रे (२५, रा. वडारवाडी, दीप बंगला चौक) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये फिर्यादी आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून त्याने तरुणीला भेटण्यास बोलवून तिला एका लॉजवर नेले. तेथे तिला तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी पाहण्यास मागितली. त्यानंतर ती सोनसाखळी परत करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीने तिची सोनसाखळी परत न करता तिच्यासोबत बोलणे बंद केल्याने व भेटणे बंद केले. मात्र, त्याने इन्स्टावर बनावट खाते तयार करून त्यावर सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसात धाव घेतली. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.