मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

By नितीश गोवंडे | Updated: May 3, 2025 19:12 IST2025-05-03T19:09:49+5:302025-05-03T19:12:15+5:30

अपघातग्रस्त कारमधील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीत कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे उघड

Mercedes speeding at 100 kmph; lost control threw a biker car straight off the flyover onto the road | मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

पुणे/धायरी : सिंहगड रोड परिसरात आज पहाटे वडगाव उड्डाणपुलावर भरधाव कारने दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेला सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. अपघातानंतर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उड्डाणपुलावरून रस्त्यावर कोसळली. कारमधील ‘एअर बॅग’ उघडल्याने कारमधील चौघेही बचावले. कार चालक तरुणासह चौघे जण जखमी झाले. दरम्यान, कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल मनोज हुशार (२३, रा. चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मित्र प्रज्योत दीपक पुजारी (२३, रा. चिंचवड) हा जखमी झाला आहे. अपघातानंतर कारचालक शुभम राजेंद्र भाेसले (२७, रा. प्राधिकरण, निगडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातात कारचालक भोसले, त्याचे मित्र निखिल मिलिंद रानवडे (२६, रा. औंध गाव), श्रेयस रामकृष्ण साेळंकी (२५, रा. चिंचवड) आणि वेदांत इंद्रसिंग रजपूत (२८) हे जखमी झाले आहेत. आरोपी भोसले ह पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, तर त्याचे दोन मित्र परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आले आहेत, तर एकाचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे महाविद्यालयीन शिक्षण (बीएस्सी काॅम्प्युटर) घेत आहेत. आरोपी भोसले याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम भोसले याच्या आईच्या नावाने कारची नोंदणी झाली आहे. शुभम शुक्रवारी रात्री कार घेऊन बाहेर पडला. त्याने मित्र निखील, श्रेयस आणि वेदांत यांना बरोबर घेतले. चौघेही रात्री उशीरा हिंजवडी भागातील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले. जेवण केल्यानंतर शुभम मित्रांना घेऊन मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने खेड शिवापूरला मॅगी खाण्यासाठी गेला. खेड शिवापूरहून कारचालक शुभम हा मित्रांसोबत पुन्हा भरधाव वेगात निगडीकडे निघाला होता. बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास कारचालक शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे बाह्यवळण मार्गाने चिंचवडकडे निघाले होते. भरधाव कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात कुणालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्याच्याबरोबर असलेला मित्र प्रज्योत गंभीर जखमी झाला.

कार ताशी १०० किमी वेगाने..

बाह्यवळण मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेग मर्यादेबाबतचे फलक जागोजागी लावले आहेत. कारचालक शुभम याने दुचाकीला धडक दिली. कारचा वेग एवढा जोरात होता की, कार थेट वडगाव उड्डाणपुलावरून खाली काेसळली. महागड्या कारमधील एअर बॅग उघडल्याने कारचालक शुभम याच्यासह त्याच्याबरोबर असलेले तीन मित्र बचावले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या कुणाल आणि प्रज्योत यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. अपघातग्रस्त कारमधील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे उघड झाले.

पोर्शे कार अपघाताची आठवण..

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी मे महिन्यात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघातापूर्वी अगरवालचा अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राने एका पबमध्ये मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

Web Title: Mercedes speeding at 100 kmph; lost control threw a biker car straight off the flyover onto the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.