भीमाशंकराच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक माणूस सुखी होऊ दे; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:41 IST2025-08-19T10:41:10+5:302025-08-19T10:41:27+5:30
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकरला येण्याची परंपरा सुरू केली होती, जी गेल्या ३१ वर्षांपासून अखंडित सुरू आहे

भीमाशंकराच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक माणूस सुखी होऊ दे; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले दर्शन
भीमाशंकर : श्री भीमाशंकराच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी होऊ दे, राज्यावर कोणतेही संकट येऊ नये आणि राज्यातील जनता सुखी होऊ दे, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे केली.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन जलाभिषेक केला. मंदिरात भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, आशिष कोडीलकर, ऋषी कोडीलकर, रत्नाकर कोडीलकर आणि प्रसाद गवांदे यांच्या वेदपठनामध्ये शिंदे यांची पूजा पार पडली. यानंतर सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीत पुण्यवचनाचा सोहळा झाला. त्यानंतर शिंदे यांनी कळमजाई मातेचे दर्शन घेतले.
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकरला येण्याची परंपरा सुरू केली होती, जी गेल्या ३१ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. यंदाही श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येऊन आपले व्रत पूर्ण केले. मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करण्याऐवजी ते मुंबईहून थेट वाहनाने भीमाशंकरला पोहोचले. या वेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत आणि सुरू असलेल्या आराखड्याबाबत काही सूचना मांडल्या. शिंदे यांनी कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल, असे आश्वासन दिले.