‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार
By नितीश गोवंडे | Updated: May 14, 2025 21:04 IST2025-05-14T21:03:07+5:302025-05-14T21:04:12+5:30
मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार

‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार
पुणे : बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनीबाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर छापा टाकून गुन्हे दाखल केले. बाणेरमधील बालेवाडी फाटा भागात ‘वेदा स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (२२), तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली, अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.
बाणेर भागातील ‘२४ थाई स्पा’ या मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लर चालक ज्योतीदेवी देवनारायण घोष (३८, रा. गहुंजे), अमनगिरी गोस्वामी (२३, रा. मुकाई चौक, रावेत) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घोष आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक दीपाली पाटील, रुपेश चाळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
मसाज पार्लरसाठी जागा देणाऱ्यांवर गुन्हे
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी ३६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.