तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:10 IST2025-09-25T15:08:54+5:302025-09-25T15:10:07+5:30
मंगळवारी दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे, चपला मिळून आले

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना
मंचर: पोंदेवाडी खडकवाडी गावच्या हद्दीवरील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नितीन नारायण सुक्रे (वय 35 रा. खडकवाडी) यांचा मृत्यूदेह सकाळी पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे. सुक्रे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
खडकवाडी येथील नितीन नारायण सुक्रे हा ३५ वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता झाला होता.पोंदेवाडी - खडकवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाच्या काठावर सुक्रे यांचे कपडे सापडल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नव्हता.
नितीन सुक्रे हा मंगळवारी दुपारी २ वाजले पासून घरातून बेपत्ता झाला होता. मंगळवारी दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे, चपला मिळून आल्यानंतर माजी उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. नितीन सुक्रे हे पाण्यात बुडाले असल्याचे निष्पन्न झाले. पारगाव पोलीस व घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे प्रमुख धनंजय कोकणे व टीम यांच्या वतीने नितीन सुक्रे याचा बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही. यादरम्यान एनडीआरएफला पाचरण करण्यात आले. दोन पथकांनी दिवसभर शोध घेतला मात्र मृतदेह हाती लागला नाही. अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी आठ वाजता नितीन सुक्रे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. एका स्थानिक व्यक्तीने तो पाहिल्यानंतर पारगाव पोलिसांना माहिती कळविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस कर्मचारी मंगेश अभंग, रमेश इचके, संजय साळवे यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. नितीन सुक्रे हे पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी व्यक्त केला आहे. खडकवाडी येथे येथील सुक्रे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.