किरण शिंदे
पुणे : पुणे शहरात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून, वाघोलीजवळील सणसवाडी परिसरात एक मोठा अपघात टळला. या पावसामुळे पुणे-अहिल्यानगरील सनसवाडी परिसरात रस्त्यावर मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत सात ते आठ दुचाकी वाहने थेट होर्डिंगखाली अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
होर्डिंग कोसळण्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. वाघोलीजवळील सणसवाडी भागात एका उंच होर्डिंगचा आधार कमकुवत झाल्याने ते अचानक कोसळले. त्यावेळी पावसामुळे वाहनांची गती कमी होती आणि वाहतूकही तुलनेने मंदावलेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली व अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू केले.
सदर होर्डिंग अधिकृत परवानगीने उभारण्यात आले होते की नाही, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यामध्ये संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून, शहरातील इतर ठिकाणी असलेल्या अशा धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.