Maharashtra Election 2019 : good day for Labor in the ' Election' period | Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या निमित्ताने मजुरांना आले 'सुगीचे दिवस'
Maharashtra Election 2019 : निवडणुकीच्या निमित्ताने मजुरांना आले 'सुगीचे दिवस'

ठळक मुद्देरॅलीमध्ये उमेदवारांमागे 'गर्दी' दिसावी म्हणून मजुरांचा वापर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते सभांपर्यंत उमेदवारांमागे 'गर्दी' दिसावी, यासाठी राजकीय पक्षांकडून मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. सभा, प्रचारफेरी, मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, घोषणाबाजी, घरोघरी पत्रकवाटप करण्यासाठी दिवसरात्र पायाला भिंगरी लावून धावणारा घटक कॉमन असतो तो म्हणजे कार्यकर्ता.. पण दिसणारी गर्दी ही फक्त कार्यकर्त्यांचीच असेल असे ठामपणे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक उमेदवारांच्या प्रचारकार्यात घोषणाबाजीसह अनेक कामे मजुरांकडून करून घेतली जात आहे. त्यामुळे प्रचारासाठी शहरातील मजुरांना काम मिळत असून निवडणुकीच्या निमित्ताने का होईना पुढील काही दिवसांकरिता तरी मजुरांना 'सुगीचे दिवस' आले आहेत.  
विधानसभा मतदार संघाची निवडणूक २१ ऑक्टोबरला आहे. मात्र गटातटातील राजकारणामुळे पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी होण्यास उत्सुक नाहीत. उमेदवारांच्या मागे असलेली गर्दी पाहून त्यांच्या लोकप्रियतेबाबतचे अनुमान काढले जाते. त्यासाठी गर्दी जमा करावी लागते. या गदीर्साठी मजुरांचा वापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
प्रचार पत्रके वाटप करणे, मंडप टाकणे, आदी कामांबरोबरच पाण्याची व्यवस्था करणे, सभास्थानी झेंडे बांधणे, नेत्यांच्या व पक्षाच्या नावाने सभेच्या ठिकाणी घोषणा देणे, रॅलीमध्ये गर्दी दिसण्यासाठी सहभागी होणे आदी कामांचा ठेकाच ठेकेदाराला दिला जात असून मजूर मिळवून देण्यासाठी ते पुरवणाऱ्या ठेकेदारांची नियुक्ती काही पक्षांकडून केली गेल्याचे समजते. या निमित्ताने मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारांचीही निवडणुकीच्या काळात चलती होते. उमेदवारांकडून प्रत्येक मजुरामागे दिवसासाठी पाचशे रुपये घेतले जात आहेत. मात्र तेवढी तितकी रक्कम मजुरांना दिली जात नाही. यामध्ये सहभागी होणाऱ्या मजुराला भोजन, चहाच्या सुविधेसह साडेतीनशे रुपये मिळत असल्याचे एका मजुराने सांगितले. .
शहरात विविध ठिकाणी असलेल्या मजूर अड्ड्यावरून हे मजूर घेतले जातात. मजुरांची आवश्यकता असेल, तेवढे मजुरांना खानपानाच्या सोयीसह मजुरी देऊन घेतले जातात. प्रचारात पक्षाची टोपी डोक्यावर घालून हातात झेंडा घेऊन घोषणाबाजी करण्याचे काम मजुरांकडून केले जाते. याशिवाय पक्षाच्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांमध्ये गर्दीअभावी नामुष्की ओढवू नये यासाठीही रोजंदारी देऊन मजुरांना बोलावण्याचे 'काँट्रॅक्ट' ठेकेदारांना दिले आहे. तसेच मजुरांची ने-आण करण्याची व्यवस्थाही उमेदवारांकडून केली जाणार असल्याचे समजते.


Web Title: Maharashtra Election 2019 : good day for Labor in the ' Election' period
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.