धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के
By नितीन चौधरी | Updated: July 20, 2023 17:56 IST2023-07-20T17:56:02+5:302023-07-20T17:56:23+5:30
राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा

धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के
पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्यापाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. कोयना, वारणा, तुळशी सारख्या मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक साठा जमा झाला आहे. राज्यात गुरुवारी सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा २१ हजार ८८५ दशलक्ष घनमीटर अर्थात सुमारे ३७ टक्के इतका झाला आहे. त्यात सुमारे १४ हजार ८७७ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. सर्वात कमी पाणीसाठा संभाजीनगर विभागात केवळ २५ टक्के पाणीसाठा असून सर्वाधिक साठा कोकण विभागात ६१ टक्के इतका झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस होत असून विशेषत: घाट परिसरात जोरदार पाऊस होत आहे. राज्यातील सर्वात मोठे समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १५६० मिमी पावसाची नोंद झाली असून गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत २५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धरणात आतापर्यंत ३६.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. राज्यात बहुतांश धरणांमध्ये आता पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ होत आहे.
राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यात जिवंत पाणीसाठा ११ हजार ३०१ दलघमी इतका आहे. हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ३९ टक्के इतका झाला आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा २ हजार ८३० दलघमी असून जिवंत पाणीसाठा २ हजार १८७ दलघमी आहे. एकूण क्षमतेच्या हा साठा ३९.६० टक्के इतका आहे. लघू प्रकल्पांमध्ये १ हजार ८४८ दलघमी असून जिवंत पाणीसाठा १ हजार ३८८ दलघमी आहे. एकूण क्षमतेच्या हा साठा २३.५९ टक्के आहे.
विभागनिहाय पाणीसाठा
विभाग दलघमी टक्के
नागपूर ३३५७.०५ ५१.८१
अमरावती २४९६.६० ४५.९५
संभाजीनगर ३५६६.५० २५.२१
नाशिक २७८९.५४ ३२.९५
पुणे ७२९०.८३ ३१.२७
कोकण २३८५.३० ६१.५२
राज्य २१८८५.८३ ३६.८५