Pune: वाहतुकीसाठी आलिशान मॉडिफाय कार; सीट काढून काळ्या काचाही लावल्या, तब्बल १ कोटींचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:09 IST2025-12-06T12:08:24+5:302025-12-06T12:09:39+5:30
बनावट आरएमडी आणि विमल गुटखा, पान मसाला, तसेच गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, विविध केमिकल्स, गुलाबपाणी, प्रिंटेड पॅकिंग बॉक्स व प्लास्टिक पॉलिथिन आदी साहित्य आढळले

Pune: वाहतुकीसाठी आलिशान मॉडिफाय कार; सीट काढून काळ्या काचाही लावल्या, तब्बल १ कोटींचा गुटखा जप्त
पुणे: बेकायदेशीरपणे गुटखा तयार करून विक्री करणाऱ्या थेऊर फाटा परिसरातील कारखान्यावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एक कोटी रुपयांचा गुटखा आणि साहित्य जप्त केले आहे. या कारवाईतपोलिसांनी कारखान्याच्या मालकासह चार जणांना अटक केली.
रोहित दुर्गादास गुप्ता (२५, रा. थेऊर), रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (५०), अप्पू सुशील सोनार (४६) व दानिश मुसाकिन खान (१८) ही पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुप्ता हा गुटख्याच्या कारखान्याचा मालक असून इतर तिघे कामगार आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकास माहिती मिळाली होती की, लोणी काळभोर जवळील थेऊर फाटा परिसरात गुटखा तयार करण्याचा कारखाना सुरू. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने गुरुवारी (दि.४) येथील कांबळे वस्तीमधील सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना बनावट आरएमडी आणि विमल गुटखा, पान मसाला, तसेच गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, विविध केमिकल्स, गुलाबपाणी, प्रिंटेड पॅकिंग बॉक्स व प्लास्टिक पॉलिथिन आदी साहित्य आढळले. पोलिसांनी या सर्व साहित्यासह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल, तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरात असलेली तीन मॉडिफाय केलेली चारचाकी वाहने आणि एक लाख ३० हजारांची रोकड जप्त केली. ही कारवाई पोलिस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास पांढरे, शुभांगी म्हाळसेकर आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.
प्रवासी कार अन् काळ्या काचा
कारखान्यात गुटखा तयार झाल्यानंतर त्याची वाहतूक करण्यासाठी तीन आलिशान कारच्या काचांना संपूर्ण काळी फित लावण्यात आली होती. सीट काढून त्यात अधिकाधिक माल बसेल, अशी व्यवस्था केली होती, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली.