पुणे : ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या बीआरटी मार्गाच्या प्रथमवर्षपूर्ती निमित्ताने पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या एका दिवसाच्या सवलतीच्या पासदर योजनेवर पुणेकरांनी अक्षरश: उड्या मारल्या आहेत. दहा दिवसांमध्ये एका दिवसाच्या पासची सरासरी विक्री ३० हजार पास होत होती; मात्र पासची किंमत ७० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आल्यानंतर, मागील दहा दिवसांत तब्बल पावणेदोन लाख पास विकले गेले आहेत. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाली आहे. पीएमपीकडून १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीसाठी हे पास देण्यात येणार आहेत.
महापालिका आणि पीएमपीकडून मागील वर्षी ‘विश्रांतवाडी ते संगमवाडी’ या मार्गावर बीआरटी सेवा सुरू केली आहे. या सेवेला १ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून प्रवासीवाढीसाठी पीएमपी कडून प्रवाशांना एका दिवसाच्या पास मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीसाठी या पासची किंमत ७० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आली. याशिवाय यापूर्वी कोणत्याही पाससाठी पीएमपीचे ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले होते; मात्र ही अटही या पाससाठी काढण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या ५० रुपयांत पीएमपीने संपूर्ण शहरात कोठेही प्रवास शक्य झाला आहे. ही सवलत देण्यापूर्वी पीएमपीच्या एका दिवसाच्या पासची विक्री दिवसाला अडीच ते तीन हजार होती. ती गेल्या दहा दिवसांत थेट दिवसाला २० ते २१ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासीसंख्याही वाढली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उत्पन्नात वाढ
पीएमपीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एका दिवसाच्या पास उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे. यापूर्वी दिवसाला या पासच्या विक्रीतून पीएमपीला सरासरी २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे; मात्र गेल्या दहा दिवसांत हे उत्पन्न प्रतिदिन ९ ते १० लाखांच्या घरात पोहोचले असून, मागील दहा दिवसांत पीएमपीला या पासमधून तब्बल ८७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळालेले आहे, तर आणखी चार दिवस शक्य असल्याने ही रक्कम एक कोटींचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.
मुदतीनंतरही एक दिवस योजना सुरू ठेवणार ?
या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही योजना प्रवासीवाढ; तसेच पीएमपीच्या उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे सवलीतीची मुदत संपल्यानंतरही ही सवलत योजना कशा प्रकारे सुरू ठेवता येईल, याबाबत पीएमपी प्रशासनाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, पीएमपीला रविवारी कमी उत्पन्न मिळते; तसेच प्रवासीसंख्याही कमी असते. त्यामुळे उत्पन्न; तसेच प्रवासी वाढविण्यासाठी प्रत्येक रविवारी व गुरुवारी सवलतीच्या दरात पास देण्याबाबत प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे.
सवलतीचाही गैरवापर, जाहिरातीबाबत नाराजी
एका दिवसाच्या पासवर उड्या पडल्या असल्या, तरी त्या पासचा गैरवापर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. या पाससाठी ओळखपत्राची अट शिथिल केली आहे. अनेक व्यक्ती अथवा काही वेगवेगळ्या व्यक्ती हा पास वापरत असल्याच्या तक्र्रारी आहेत. हा पास संपूर्ण दिवसभर चालत असल्याने एकाचा प्रवास झाल्यानंतर दुसरी व्यक्ती तोच पास आपल्या प्रवासाठी वापरत आहे. या योजनेसाठी केलेल्या जाहिरातीवरूनही काही अस्सल पुणेकरांनी पीएमपीचे कान उपटले आहेत. या पाससाठी केलेल्या जाहिरातीत ५० रूपयांत कुठेही भटका असा मजकूर आहे. त्यामुळे भटकायला काय आम्ही मोकाट कुत्री आहोत का ? अशा शब्दांत काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सवलतीच्या पासवर उड्या
By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST
‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या बीआरटी मार्गाच्या प्रथमवर्षपूर्ती निमित्ताने पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या एका दिवसाच्या सवलतीच्या पासदर योजनेवर पुणेकरांनी अक्षरश
सवलतीच्या पासवर उड्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}