पुणे : लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. तसेच जाणारे प्रवासीही कमी झाले आहेत. प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.देशातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर दि. २५ मे पासून पुणे विमानतळावरून विमानांची ये-जा सुरू झाली. पहिल्या दिवशी केवळ २६ विमानांची ये-जा झाली. पण त्यानंतर हा आकडा ५० पर्यंत वाढत गेला. तसेच प्रवासी संख्याही वाढली. पुण्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येसह विमान उड्डाणेही कमी झाली. त्यानंतर विमान उड्डाणे वाढली तरी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांमध्ये निम्म्याने घट झाल्याचे दिसते. बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २०) पुण्यात २२ विमाने उतरली असून त्यामध्ये ८७६ प्रवासी होते. तर विविध शहरांकडे उड्डाण केलेल्या २२ विमानांमधून १६१५ प्रवासी गेले. दि. १० जुलै रोजी प्रवाशांची संख्या अनुक्रमे १६५५ व २४६३ एवढी होती.
लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 20:28 IST
प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान कंपन्या व रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली
ठळक मुद्देलॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर २५ मे पासून पुणे विमानतळावरून विमानांची ये-जा सुरू