नवले पुलाजवळ सेवा रस्त्यांसाठी ५४ गुंठे जागेचे भूसंपादन, पीएमआरडीच्या प्रस्तावाला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:50 IST2025-11-18T15:49:48+5:302025-11-18T15:50:04+5:30
नवले पुलाजवळ झालेल्या अपघातानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत

नवले पुलाजवळ सेवा रस्त्यांसाठी ५४ गुंठे जागेचे भूसंपादन, पीएमआरडीच्या प्रस्तावाला मान्यता
पुणे : गेल्या आठवड्यात नवले पुलाजवळ झालेल्या अपघातानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील सेवा रस्ते अधिक रुंद करण्यात येणार आहेत. पुलाजवळ दोनशे मीटरच्या बाह्य सेवा रस्त्यासाठी ५४ गुंठे जागेच्या भूसंपादनाचा पीएमआरडीएने पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (दि. १७) मान्यता दिली. यासाठी ५ ते ६ कोटींचा खर्च येणार आहे.
नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर पुणे महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) विविध पद्धतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील स्थानिकांना तसेच मुंबईहून सातारा आणि साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना नवले पुलावरून प्रवास करावा लागतो. कात्रज, नऱ्हे, आंबेगाव, वारजे, वडगाव येथील स्थानिक नागरिकांना बाह्य सेवा रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांची वाहने पुलावर येत असल्याने त्या ठिकाणी गर्दी आणि वाहतूक कोंडी होते. त्यातून वारंवार अपघात होत असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. यासाठी सेवा रस्ता करण्याची गरज असून, यासाठी ५४ गुंठे भूसंपादन करावे, अशी मागणी एनएचएआयने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, बाह्य सेवा रस्ता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने आता बाह्य सेवा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर भूसंपादनासाठी सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या जागेची दरनिश्चिती करण्यात आली आहे. तसेच तेथील जागेची मोजणीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
नवले पुलाजवळील दोनशे मीटर बाह्य सेवा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्या रस्त्यासाठी जागा संपादनासाठी पीएमआरडीएने भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दीड महिन्यापूर्वी पाठविला होता. त्या प्रस्तावाला सोमवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुलाजवळ दोनशे मीटर रुंदीचा बाह्य सेवा रस्ता तयार होणार आहे.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी