पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:59 IST2025-06-24T17:58:16+5:302025-06-24T17:59:12+5:30

 भोसरी एमआयडीसीतील उद्योजकांचा हताश आक्रोश, उपाययोजनांबाबत महापालिका, एमआयडीसीची डोळेझाक होत असल्याचा उद्योजकांचा आरोप

Labor and dreams washed away in the rain water; Entrepreneurs in Bhosari MIDC heartbroken | पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

- गोविंद बर्गे
 
पिंपरी :
भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक परिसर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या कहराखाली आहे. आकाशातून बरसणाऱ्या पाण्यासोबत अनेक उद्योजकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. यंत्रसामग्री पाण्यात बुडाली, उत्पादन थांबले, कोट्यवधींचा माल पाण्यात गेला. पण, या सर्वांत अधिक दुःखद गोष्ट म्हणजे, वर्षानुवर्षांची मेहनत आणि स्वप्नं क्षणार्धात वाहून गेली.

भोसरी एमआयडीसी परिसराला नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसाचे पाणी शिरल्याने अनेक छोट्या - मोठ्या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पावसाच्या पाण्याने कंपनीतील उत्पादित माल खराब झाला असून, यंत्रसामग्रीही जलमय झाली. परिणामी उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली. उद्योजकांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसाने अनेक कंपन्यांमध्ये रस्त्यावरून वाहात येणारे पाणी घुसले. त्यामुळे उत्पादित मालाचे मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाल्याने कामकाज थांबवावे लागले. अनेक ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे यंत्रसामग्रीही बंद पडली.

हे चित्र दरवर्षीचे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योजक या समस्येवर उपाययोजनांची मागणी करीत आहेत. मात्र, महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून, कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. आम्ही लाखो रुपयांचा कर वेळेवर भरतो. मात्र, पावसाळी पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. पावसाच्या पाण्याने आमचे मोठे नुकसान झाले. काही कंपन्यांनी प्रशासनाची वाट न बघता विद्युत मोटारी लावून कंपनीतील पाणी बाहेर काढले. येथील उद्योजकांमध्ये प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र नाराजी आहे.
 

महावीर रबर इंडस्ट्रीजमध्ये पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात शिरल्याने कंपनीची भिंत कोसळली. रस्त्यावरील कचरा आणि मातीही वाहून आली. पाण्याचा निचरा व कचरा साफ करण्यासाठी चार दिवस लागले. या कालावधीत कंपनीतील कामकाज बंद ठेवावे लागले. त्यामुळे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. -नयन भंडारी ,महावीर रबर इंडस्ट्रीज, टी ब्लॉक भोसरी एमआयडीसी
 

ग्रँटॅक इंडस्ट्रीजसह शेजारील चार कंपन्यांसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साठते. अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्यास रस्त्यावर तळे तयार होऊन हे पाणी थेट कंपन्यांमध्ये शिरते. येथील रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्ता थोडा उंच झाला. तसेच भूमिगत सांडपाणी वाहिनी अर्धवट ठेवल्याने हे पाणी कंपन्यांमध्ये शिरून सतत नुकसान होते. गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा ही परिस्थिती उद्भवली होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.  -कृष्णा वाळके, मालक, ग्रँटॅक इंडस्ट्रीज, भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक.

 
या परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे केली होती. स्थापत्य विभागाला सूचना देऊन सध्या निर्माण झालेली समस्या तातडीने दूर केली जाईल. - पजा दुधनाळे, क्षेत्रीय अधिकारी, ह प्रभाग.
 
एमआयडीसी भागातील उद्योजकांच्या समस्यांबाबत महापालिका आणि एमआयडीसीचे सातत्याने दुर्लक्ष होते. तक्रारी केल्यास एकमेकांकडे बोट दाखविले जाते. अधिकाऱ्यांनी केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा या भागात पाहणी दौरा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अभय भोर, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.

Web Title: Labor and dreams washed away in the rain water; Entrepreneurs in Bhosari MIDC heartbroken