Pune Temperature: कोरेगाव पार्क चाळिशी पार, ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:02 IST2024-04-01T10:01:13+5:302024-04-01T10:02:05+5:30
येत्या दोन दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

Pune Temperature: कोरेगाव पार्क चाळिशी पार, ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा
पुणे: शहरातील तापमान चाळिशीच्या जवळ गेले असले तरी देखील ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. शनिवारी रात्री १२ नंतर शिवणे, एरंडवणे, सिंहगड रोड या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर रविवारी दिवसभर मात्र ढगाळ वातावरण आणि निरभ्र आकाशही पाहायला मिळाले. कोरेगाव पार्कला ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी आज पाऊस झाला, तर येत्या दोन दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उद्या राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील नगर, सातारा, सोलापूर, वर्धा, नागूपर, बीड, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. येथे यलो अलर्ट दिला आहे.
पुण्यातील वडगावशेरीला सर्वाधिक किमान तापमान २८.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर मगरपट्टा, कोरेगाव पार्क या ठिकाणी किमान तापमान २६ अंशांवर होते. रात्री देखील उष्णता वाढलेली आहे. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.
पुण्यातील कमाल तापमान
शिरूर - ४२.४
कोरेगाव पार्क - ४०.८
राजगुरूनगर - ४०.२
वडगावशेरी - ३९.४
हडपसर - ३९.४
मगरपट्टा - ३८.६
शिवाजीनगर - ३८.४
पाषाण - ३८.२