कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST2021-07-28T04:11:58+5:302021-07-28T04:11:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला ...

Konkan, Western Maharashtra at risk of rains again | कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या ३० व ३१ जुलैला हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा धोका वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वार्‍याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ३० व ३१ जुलैला तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोकणात बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ९०, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ७०, राधानगरी ६०, इगतपुरी, वेल्हे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडला. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेगवान वारे वाहणार

२९ जुलै रोजी कोकणातील किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ३० व ३१ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Konkan, Western Maharashtra at risk of rains again