Pune Crime: पोलिसांनाच दाखवला कोयता; पाठलाग करत आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:30 AM2024-03-23T11:30:31+5:302024-03-23T11:30:59+5:30

याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....

Koita was shown to the police; Chasing and handcuffing the accused Pune Crime | Pune Crime: पोलिसांनाच दाखवला कोयता; पाठलाग करत आरोपीला बेड्या

Pune Crime: पोलिसांनाच दाखवला कोयता; पाठलाग करत आरोपीला बेड्या

पुणे : संशयित वाहनाचा पाठलाग करत असताना पोलिसांनाच कोयता दाखवल्याची घटना मुंढवा भागात घडली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता गाडीत १ हजार १४० लिटर हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विलास बाबासाहेब चव्हाण (४१, रा. काळेपडळ, हडपसर), बापू अशोक जाधव (रा. लोणकर वस्ती, मुंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंढवा पोलिसांच्या वतीने झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होती. त्यावेळी एक चारचाकी वाहन वेगात गेल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना संशय आला. पोलिसांनी खासगी वाहनाने त्याचा पाठलाग केला असता पिकअपच्या चालकाने लोखंडी कोयता दाखवून गाडी अडवायची नाही, असा इशारा केला. तेव्हा आरोपींना पोलिस असल्याचे सांगताच ते लोखंडी हत्यार जागेवर टाकून पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला अडवले. यानंतर पोलिसांनी वाहन तपासले असता पिकअपमधील निळ्या ड्रममध्ये हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी २ लाखांची चारचाकी, ३८ कॅनमध्ये असलेली १ लाख २५ हजार ४०० रुपयांची गावठी दारू आणि कोयता असा ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम, सहायक निरीक्षक संजय माळी, अण्णासाहेब टापरे, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, स्वप्नील रासकर, नीलेश पालवे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title: Koita was shown to the police; Chasing and handcuffing the accused Pune Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.