आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:25 IST2025-01-21T10:24:33+5:302025-01-21T10:25:06+5:30

विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले

Kisan Maharaj Sakhre, a scholar of saint literature from Alandi, passes away | आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

आळंदी : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय ८९) यांचे सोमवारी रात्री चिंचवड येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. तीर्थक्षेत्र आळंदीत आज (दि.२१) सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
          
तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी (दि. २०) हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे महाराज यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ आणि मुलगे यशोधन साखरे व चिदम्बरेश्वर साखरे आहेत. आळंदी येथील साधकाश्रमात गुरू- शिष्य परंपरेचा अंगीकार करून साखरे महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. १९६० मध्ये साधकाश्रमाची धुरा साखरे महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून निःस्वार्थीपणे साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.

एकूण ५०० ताम्र पटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित
          
श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. श्री क्षेत्र आळंदी देह परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे. साखरे महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ लिहिले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थं उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली. एकूण ५०० ताम्र पटांवर यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे. साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे २०१८ मध्ये 'ज्ञानोबा तुकाराम' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अनेक विद्यापीठात मार्गदर्शक 
        
 महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले होते. टिळक मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा ध्यास साखरे महाराजांनी घेतलेला असल्याने मोफत बाल संस्कार शिबिरांची संकल्पना त्यांनी यशस्वीरीत्या राबविली. श्रीमद्भगवतगीता आणि ज्ञानेश्वरीच्या प्रचार, प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाराणसी, वृंदावन, रामेश्वर आदी ठिकाणी गीता ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचे आयोजन अनेकवेळा केले. संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी सी. डी. ए. सी. म्हणजे प्रगत संगणक अध्ययन केंद्राचा प्रारंभ केला. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना संगणक शास्त्रात शिक्षण देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अध्यात्म क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आदी विद्यापीठात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट पदवीच्या परीक्षक मंडळावर सदस्य म्हणून साखरे महाराज यांनी काम केले होते. 

व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य
          
आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली ४५ वर्षे स्वस्तिश्री या मासिकाचे संपादन ते करीत होते. बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अशा संस्थांचे विश्वस्तपद त्यांनी भूषविले आहे. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.

Web Title: Kisan Maharaj Sakhre, a scholar of saint literature from Alandi, passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.