Khadakwasla dam is hundred percent full; 428 cusecs of river water release started | पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला धरण शंभर टक्के भरले ; ४२८ क्युसेकने नदीत पाणी विसर्ग सुरु 

पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला धरण शंभर टक्के भरले ; ४२८ क्युसेकने नदीत पाणी विसर्ग सुरु 

पुणे : खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणपाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या पुण्याची वर्षभर तहान भागवेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार या घडीला दूर झाल्याने नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि. १२) सकाळी खडकवासला धरण हे ९९.१६ टक्के क्षमतेने भरले असून मुठा नदीत ४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्याने धरणांतील पाणी साठ्याबाबात गंभीर परिस्थितीत निर्माण झाली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळा हंगामातील पहिले दोन महिने म्हणजे जुन, जुलैमध्ये पावसाने पूर्णपणे दाडी मारली. यामध्ये जुनच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाले आणि नद्यांना पण पाणी आले. या चक्रीवादळात झालेल्या पावसावर शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने दडी दिली. यामुळे पेरणी झालेली पिके धोक्यात आली होती. तसेच धरणांतील पाणी साठा 15-20 टक्क्यांवर आले होते. दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत धरणसाठा शंभर टक्के होत असते. 

गेल्यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होता. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज  नव्हती. जून पासून पावसाळा सुरू झाल्यापासून जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पाणी साठ्यात  समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. पाऊस नाही आणि संपत चाललेला पाणीसाठ्यामुळे  नियोजन करून पाणी कपात करणार असल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, आता पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा वाढत असल्याने शहराची पाणी कपात करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील ३० ते ४० दिवसांत पावसाने उघडीप दिल्यामुळे पुणेकरांसह शेतकरीही चिंतातूर झाला होता. पावसाने त्यांना दिलासा मिळाला आहे. आता खडकवासला प्रकल्पाचे पाणी शेतीलाही देण्यात येणार आहे. त्याचा फायदा दौंड, इंदापूर मधील शेतीला होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Khadakwasla dam is hundred percent full; 428 cusecs of river water release started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.