पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:24 IST2025-04-23T08:24:16+5:302025-04-23T08:24:47+5:30

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू

Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Two from Pune injured in terrorist attack in Pahalgam Jammu and Kashmir | पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब

पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब

पुणे : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२२) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील जगदाळे व गनबोटे अशी दोन कुटुंब पर्यटनासाठी गेली होती. त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांना हल्ल्यात गोळ्या लागल्या यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची झाल्याची माहिती मिळाली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या घटनेनंतर केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे जम्मू-काश्मीर येथील जगदाळे आणि गनबोटे यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना गोळ्या झाडल्याचे मुलीने सांगितल्यावर काळीज हेलावले असल्याचे ते म्हणाले.

जम्मू- काश्मीर येथे महाराष्ट्रातील पुण्यासह विविध भागांतून पर्यटक फिरायला गेले आहेत. पहलगामध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तिथे पुण्यातील गनबोटे आणि जगदाळे अशी दोन कुटुंबे होती. त्यामध्ये आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, तसेच कौस्तुभ गनबोटे व संगीता गनबोटे यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात यातील संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या. यातील एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या असल्याचे समजते.

पुण्यातील पर्यटकांवर हल्ला झालेल्यांची कुटुंबे मूळची बारामती तालुक्यातील असून, सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदांतनगरीजवळ राहतात.

याबाबत घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत'शी बोलताना सांगितले होते की, 'मी जगदाळे यांची मुलगी, पत्नी, तसेच गनबोटे यांची पत्नी अशा तिघांच्याही संपर्कात आहे. हल्ल्यात जखमी झालेले जगदाळे आणि गनबोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले , त्यांच्या कुटुंबालाही लष्कराने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मात्र, त्यांना उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात नेले , हे कुटुंबाला सांगण्यात आलेले नाही.अशीही माहिती त्यांनी दिली होती.

दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या विविध भागात पुण्यातील लोक पर्यटनासाठी गेले आहेत. हल्ला झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे भीतीने फोन येत आहेत; पण सर्व जण सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Two from Pune injured in terrorist attack in Pahalgam Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.