जय पवारांचे लग्न भारतात नव्हे तर 'या' देशात होणार; दोन्ही कुटुंबांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:01 IST2025-12-03T12:01:11+5:302025-12-03T12:01:40+5:30
Jai Pawar Wedding : जय पवारांच्या लग्नात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कुटुंब सहभागी होण्याची चिन्हं आहेत

जय पवारांचे लग्न भारतात नव्हे तर 'या' देशात होणार; दोन्ही कुटुंबांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत बीकेसी येथील जिओ सेंटर येथे पार पडला. पवारांचे दुसरे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा भारतात नव्हे तर बहरीनमध्ये पार पडणार आहे. उद्यापासून चार ते सात डिसेंबर या कालावधीत हा विवाह सोहळा होणार आहे. हा विवाह सोहळा भारतात नसून सौदी अरेबिया जवळ असणाऱ्या बहरीन या देशात असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेत्यांना या लग्न समारंभासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा त्यामध्ये समावेश आहे. बहरीनमधील विवाह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. परदेशात होणाऱ्या या सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यात जवळच्या व्यक्तींनाच निमंत्रण देण्यात आले आहे. हा विवाह सोहळा परदेशात होत असला, तरी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबात लगबग सुरु झाली आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनीही लग्नात सहभागी झाले होते. त्यामुळे आता जय पवारांच्या लग्नातही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कुटुंब सहभागी होण्याची चिन्हं आहेत.
असा होणार ४ ते ७ डिसेंबरचा सोहळा
४ डिसेंबर - मेहंदी
५ डिसेंबर - हळद, वरात आणि मुख्य लग्नसोहळा
६ डिसेंबर - संगीत
७ डिसेंबर - स्वागत समारंभ