पुणे: ढोल-ताशांचा गजर, मराठी-बाॅलिवूडच्या गाण्यांवर थिरकलेली तरुणाई, टाईम ट्रायलसाठी ट्रॅक रिकामा करण्यासाठी सुरू असलेली अधिकाऱ्यांची लगबग, सायकल सज्ज करून ट्रॅकवर उतरण्यासाठी तयार झालेले जगभरातील सायकलपटू अशा उत्साही वातावरणात सोमवारी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर ‘पुणे ग्रॅण्ड टूर‘ला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ७.५ किलोमीटरच्या टाईम ट्रायलला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जगभरातील ३५ देशांतील २८ नामवंत संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत.
सायलकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने पुणे ग्रॅण्ड टूरबद्दल प्रचंड उत्सुकता होती. टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर होणाऱ्या या शर्यतीच्या टाईम ट्रायलला सोमवारी दुपारी १:३० वाजता सुरुवात झाली. शहरातील नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली. यावेळी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
या प्रोलॉग रेसमध्ये स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात एकामागोमाग एक मिनिटाच्या अंतराने सुरुवात केली. ही मुख्य स्पर्धा नसून प्रत्येक सायकलपटूची वैयक्तिक वेळ निर्णायक ठरणार आहे. पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले. पुढील चार दिवस सह्याद्रीच्या घाट रस्त्यावर रंगणारी चुरस अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.
पुणेकरांच्या प्रेमामुळे भारावले खेळाडू
जागतिक खेळाडूंना पुणेकरांच्या आदरातिथ्यासोबत उत्साह आणि क्रीडाप्रेमींचा परिचय देत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मोबाइलवर खेळाडूंचे छायाचित्र घेण्यासाठी युवकांमध्ये चढाओढ होती. पुणेकरांचा हा प्रेमळ प्रतिसाद पाहून अनेक खेळाडूंनी हात हलवून अभिवादन स्वीकारले.
‘मस्कॉट’ ठरले आकर्षण
पुणे ग्रँड टूरचे रंगीत बोधचिन्ह आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. मस्कॉटसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने महाराष्ट्राचे ‘शेकरू’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. निसर्ग आणि खेळ यांच्यातील नाते सांगणाऱ्या ‘इंदू’ मस्काॅटने टाईम ट्रायलमध्ये आनंदरंग भरले. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून वावरणारा शेकरू सायकलपटूंच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचा संदेश त्याने दिला.
ट्रॅकवर कुत्र्याची घुसखोरी
टाईम ट्रायल सुरू असताना प्रमुख पाहुण्यांच्या समोर अचानक भटके कुत्रे ट्रॅकवर घुसल्याने काही वेळ गोंधळ झाला पण स्वयंसेवकांनी कुत्र्याला बाहेर काढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
स्क्रीन नसल्याने चाहत्यांची गैरसोय
शर्यत संपते त्याठिकाणी सुरुवातीच्या ठिकाणाची क्षणचित्रे दाखविण्यासाठी कोणतीही स्क्रीन न लावल्यामुळे सायकल चाहत्यांची गैरसोय झाली. तसेच, शर्यत सुरू होत असलेल्या ठिकाणीही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली नव्हती
Web Summary : Pune Grand Tour 2026 began with fervor as cyclists from 35 countries competed in a 7.5 km time trial. The event, marked by dhol-tasha music and enthusiastic crowds, promises a challenging 437 km race through the Sahyadri ranges. 'Indu' the mascot added to the celebration.
Web Summary : पुणे ग्रैंड टूर 2026 का शानदार आगाज़ हुआ। 35 देशों के साइकिल चालकों ने 7.5 किमी की टाइम ट्रायल में भाग लिया। ढोल-ताशे और उत्साही भीड़ के साथ, यह आयोजन सह्याद्री पर्वतमाला में 437 किमी की चुनौतीपूर्ण दौड़ का वादा करता है। 'इंदु' शुभंकर ने उत्सव में रंग भर दिया।